महापुरामुळे युएईसह दुबईमध्ये हाहाकार

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 13 d ago
दुबई पूर
दुबई पूर

 

संयुक्त अरब अमीरात (UAE) आणि त्याच्या आसपासच्या वाळंवटात मंगळवारी तुफान पाऊस झाल्याने भीषण पूर आल्याचा प्रकार समोर आला आहे. जगातील सर्वात अधुनिक शहरांपैकी एक असलेल्या दुबईमध्ये रत्यावर पाणी वाहू लागल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील बंद करावा लागला. अनेक वाहने रस्त्यांवर अडकून पडले, शॉपिंग मॉल पासून ते मेट्रो स्टेशनपर्यंत सगळीकडे पाणी शिरलं.

गार्डियनच्या एका रिपोर्टनुसार पाऊस सोमवारी रात्रीपासून सुरू झाला आणि मंगळवार रात्रीपर्यंत दीड वर्षात होतो इतका पाऊस एकाच दिवशी झाला. यूएईच्या आधी ओमान येथील अधिकाऱ्यांनी पूराची शक्यता वर्तवली होती, यावेळी देशात मागील ७५ वर्षात सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दरम्यान वाळवंटात अचानक इतका पाऊस का झाला? हा प्रश्न सगळ्यांना पडतो आहे.

लांबवर पसरलेले वाळवंट आणि उष्ण हवामान अशी ओळख असलेल्या संयुक्त अरब अमिरातीला मंगळवारी (ता.१६) अतिवृष्टीने झोडपून काढले. जागतिक व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या दुबईमध्ये दीड-दोन वर्षांत जितका पाऊस पडतो तितका पाऊस एकाच दिवसात पडल्यामुळे रस्ते आणि शहराचा बराचसा भाग पाण्याखाली गेला.

या प्रचंड पावसामुळे आज दुसऱ्या दिवशीही जनजीवन ठप्प झाले होते. विमानतळांवरही पाणी साचल्याने अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागली.

दुबईत मंगळवारी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. येथील मागील ७५ वर्षांच्या नोंद झालेल्या इतिहासात एवढा पाऊस झालेला नाही. बाहरीन, ओमान, कतार आणि सौदी अरेबियातही पाऊस कोसळला. ‘यूएई’त २४ तासांमध्ये १० इंच पाऊस झाला. जगातील अत्यंत व्यग्र विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई विमानतळावर ३.७३ इंच पाऊस कोसळला. त्यामुळे हवाई वाहतूक ठप्प होऊन हजारो प्रवासी विमानतळावरच खोळंबले. अनेक मेट्रो स्थानके, मॉल, रस्ते, व्यावसायिक इमारतींमध्ये पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. पावासामुळे ‘युएई’मध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. घरे आणि आस्थापनांचेही मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यांवर प्रचंड कचरा आला असून तो साफ केला जात आहे.

ओमानमध्ये मुसळधार पावसामुळे मागील काही दिवसांत १९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्या देशाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रवाशांचे हाल
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विमानतळाची सेवा मंगळवारी आणि आजही बंद ठेवण्यात आली होती. अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली. प्रवासाचे नियोजन असणाऱ्या प्रवाशांना ‘विमानतळावरच येऊ नका’ अशा सूचना देण्यात आल्या.

हे असू शकतं कारण?
यूएईची सरकारी वृत्तसंस्था WAM ने मंगळवारी या पावसाला ऐतिहासिक घटना म्हटले आहे. १९४९ मध्ये डेटा गोळा करण्यास सुरूवात झाल्यापासून हा सर्वाधिक पाऊस देशात झाला आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मते निसर्गासोबत छेडछाड केल्याचा परिणाम असल्याचे सांगत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार दुबई आणि संयुक्त अरब अमीरातच्या दुसऱ्या भागात नुकतेच पाऊस आणि त्यानंतर पूर येण्याची घटना क्लाउड सीडिंगशी संबंधीत आहे.

संयुक्त अरब अमीरात पृथ्वीवरील सर्वात उष्ण आणि कोरड्या प्रदेशात येतेय या देशात पाऊस वाढवण्यासाठी क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा वारर करण्यात येतो. या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश वाढत्या लोकसंख्येसाठी आणि अर्थव्यवस्थेची पाण्याची गरज भागवण्यासाठी पाण्याची गरज पूर्ण व्हावी हा आहे. यामुळे देशात पर्यटन आणि इतर क्षेत्रांमध्ये विविधता येत आहे. यूएईने २००२ मध्ये आपले क्लाउड सीडिंग ऑपरेशन सुरू केले होते. ब्लूमबर्ग रीपोर्टनुसार हवामान तज्ज्ञ अहमद हबीब यांनी सांगितले की नुकतेच सीडिंगसाठी विमानांना अल-एन विमानतळावर पाठवण्यात आले होते.

क्लाउड सीडिंग काय असतं?
कृत्रीम पाऊस पाडण्याच्या प्रक्रिया तंत्रज्ञानाला क्वाउड सीडिंग असे म्हटले जाते. या मध्ये विमान किंवा किंवा हेलीकॉप्टरचा वार करून ढगांमध्ये सिल्वर आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइड सारखे पदार्थ टाकले जातात. यूएईच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त पाऊस पडावा यासाठी सीडिंग विमानांना दोन दिवसांत सात वेळा उड्डाणे केली होती.

‘क्लाउड सीडिंग’चा परिणाम?
आखाती देशांमध्ये झालेला पाऊस हा ‘क्लाउड सीडिंग’चा परिणाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याच्या या पद्धतीत छोटी विमाने ढगांमध्ये जाऊन विशिष्ट प्रकारचे मीठ फवारतात. या मिठामुळे ढगांमध्ये पाणी निर्माण होऊन पाऊस कोसळतो. हा पाऊस कोसळण्यापूर्वी सहा ते सात विमानांद्वारे मीठ फवारणी झाली होती, असा दावा केला जात आहे. सरकारने मात्र या दाव्याचा इन्कार केला आहे. ओमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळेच पाऊस कोसळल्याचे ‘यूएई’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.