गाझामधील संघर्षात पॅलेस्टिनी नागरिकांच्या मानवी अधिकारांचा भंग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 4 Months ago
गाझा संघर्ष
गाझा संघर्ष

 

मागील वर्षी सात ऑक्टोबरला हमासने इस्राईलवर केलेल्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीत सुरू झालेल्या संघर्षादरम्यान दोन्ही बाजूंकडील नागरिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आणि मानवाधिकारांचा भंग झाल्याचा दावा मानवाधिकार तज्ज्ञांनी एका अहवालाद्वारे केला आहे. या अहवालाला संयुक्त राष्ट्रांनीही दुजोरा दिला आहे.

मानवाधिकार तज्ज्ञांनी विविध माध्यमांमध्ये झालेल्या वार्तांकनांचा व काही स्थानिकांशी संवादानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे. यानुसार, हमासचे दहशतवादी व इस्राईलचे सैनिक यांनी युद्धगुन्हे केले आहेत. इस्राईलच्या सैनिकांनी नागरिकांवर, विशेषत: महिलांवर क्रूर अत्याचार केल्याचेही अहवालात म्हटले आहे. इस्राईलने मात्र हा अहवाल नाकारत तो दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे.

अहवाल तयार करताना तज्ज्ञांनी मागील वर्षी सात ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी विचारात घेतला होता. दहशतवाद्यांनी इस्राईलमध्ये आणि सैनिकांनी गाझा पट्टीमध्ये मानवाधिकारांचा भंग केल्याचे आणि क्रूर गुन्हे केल्याचे अहवालात म्हटले आहे. इस्राईलच्या सैनिकांवर तर, नागरिकांना उपाशी ठेवणे, खून करणे, सामूहिक शिक्षा करणे, सामान्य नागरिकांवर हल्ले करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनीही इस्राईलवर हल्ला करताना जाणीवपूर्वक सामान्य नागरिकांना ठार मारले आणि अपहृतांचाही छळ केला, असा ठपका ठेवण्यात आला आहे. इस्राईलच्या सैनिकांनी तर इतक्या मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचार केले आहेत की, तो सैन्याच्या धोरणाचाच भाग असेल का, अशी शंका तज्ज्ञांनी उपस्थित केली.

हमासला हवा योजनेत बदल
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने मंजूर केलेल्या शस्त्रसंधीच्या योजनेत बदल करण्याची मागणी हमासने केली आहे. शस्त्रसंधी, सैन्यमाघारी, शहरांची पुनर्बांधणी आणि पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका यांबाबत ठोस आश्‍वासन हवे असल्याचे हमासने कळविल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले. या चर्चेसाठी प्रामुख्याने कतार आणि इजिप्त हे देश मध्यस्थी करत असून, अमेरिकेचीही यात महत्त्वाची भूमिका आहे.