इराणमध्ये शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान केले. दोन वर्षांपूर्वी सरकारविरोधात झालेल्या प्रचंड मोठ्या आंदोलनानंतर या देशात प्रथमचम मोठी निवडणूक होत असून या निवडणुकीच्या निकालाकडे जगभराचे लक्ष लागले आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी मतदानाला सुरुवात होताच मतदान केले. १९८१ मध्ये बाँबस्फोटात इजा झालेला त्यांचा हात मतपत्रिका पेटीत टाकताना थरथरत होता. नागरिकांनी शक्य तितक्या लवकरच आणि मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी सकाळी केले.
‘या निवडणुकीकडे आपले मित्र आणि शत्रू अशा दोघांचेही बारीक लक्ष आहे. आपल्या मित्रांना खूश करा आणि इराणच्या वाईटावर असणाऱ्या शत्रूला तोंडघशी पाडा,’ असे आवाहन त्यांनी जनतेला केले. यानंतर दिवसभर इराणमध्ये मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावून मतदान केले. मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती. निवडणुकीचा निकाल उद्या (शनिवारी) जाहीर होण्याची शक्यता आहे.
इराणच्या संसदेत २९० सदस्य असतात. या जागांसाठी जवळपास १५ हजार उमेदवार रिंगणात आहेत. चार जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव असतात. निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाल चार वर्षांचा असतो. या निवडणुकीत देशाच्या तज्ज्ञसभेवरही नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.
या सभेवर निवड केले जाणारे सर्व सदस्य मुस्लीम धर्मगुरु असतात आणि त्यांचा कार्यकाळ आठ वर्षांचा असतो. खामेनी यांनी राजीनामा दिल्यास अथवा त्यांचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या जागी नवा सर्वोच्च नेता निवडण्याचे अधिकार या तज्ज्ञसभेला असतात.