वॉशिंग्टन (पीटीआय) : लंडन आणि सॅनफ्रान्सिस्को येथील भारताच्या दूतावासांवरील हल्ल्यांप्रमाणेच वॉशिंग्टनमधील दूतावासामध्येही धुडगूस घालण्याचा खलिस्तानवाद्यांनी प्रयत्न केला. मात्र, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने आणि स्थानिक पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने खलिस्तान समर्थकांचा डाव फसला. भारतीय दूतावासाने आणि अमेरिकेतील शीख समुदायाने खलिस्तान समर्थकांचा निषेध केला.
खलिस्तान समर्थक गेल्या काही काळापासून सक्रीय झाले असून त्यांनी ब्रिटन आणि अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि वाणिज्य कार्यालयांबाहेर निदर्शने केली आहेत. या निदर्शनांदरम्यान दगडफेक, दूतावासात घुसून धुडगूस घालणे, भारतविरोधी घोषणाबाजी करणे असे प्रकार त्यांनी केले आहेत. यानंतर आज अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील भारताच्या दूतावासाबाहेरही आज शेकडो खलिस्तान समर्थक जमले होते. त्यांनी राजदूत तरणजितसिंग संधू यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत घोषणाबाजी केली आणि जाहीररित्या धमकीही दिली. संधू त्यावेळी दूतावासात उपस्थित नव्हते. निदर्शकांपैकी अनेक जण भारतात हिंसाचार घडवून आणण्याची भाषा बोलत होते. तसेच, त्यांनी वॉशिंग्टनमधील दूतावासातील जागेतही तोडफोड करण्याचा इशारा दिला. त्यांची भाषणबाजी ऐकून आणि इतर माहितीच्या आधारावर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने तातडीने स्थानिक पोलिसांची मदत घेत दूतावासाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला.
दूतावासाची पाटी फोडण्याचा प्रयत्न
दूतावासासमोरील रस्त्याच्या विरुद्ध बाजूला खलिस्तान समर्थकांची निदर्शने सुरु असताना त्यातील पाच जण अचानक रस्ता ओलांडून दूतावासासमोर पळत गेले आणि त्यांनी दूतावासाचे नाव लिहिलेली पाटी फोडण्याचा प्रयत्न केला. या पाटीशेजारीच तिरंगा ध्वजही होता. मात्र, धोका लक्षात येताच अमेरिकी गुप्तचर विभागाचे अधिकारी तातडीने तेथे पळत गेले आणि त्यांनी खलिस्तान समर्थकांना रोखले. त्यामुळे तिरंगा ध्वजाचा अवमान करण्याचाही त्यांचा प्रयत्न फसला. लंडनमधील उच्चायुक्तालयातील तिरंगा खेचण्याचा प्रयत्न खलिस्तानवाद्यांनी केला होता.
पत्रकाराला मारहाण
खलिस्तान समर्थकांनी अनेक काठ्या आणून जवळच्या उद्यानात ठेवल्याचे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे (पीटीआय) वॉशिंग्टनमधील प्रतिनिधी ललित झा यांनी पाहिले. सॅनफ्रान्सिस्को येथील वाणिज्य कार्यालयाच्या काचा फोडण्यासाठी अशाच प्रकारच्या काठ्यांचा वापर झाला होता. याच उद्यानातील महात्मा गांधीजींचा पुतळाही खलिस्तानी झेंड्यांनी झाकून टाकला होता. या प्रकाराचे वार्तांकन करणाऱ्या ललित झा यांच्याबरोबर निदर्शकांनी गैरवर्तणुक केली. त्यांनी ललित झा यांचा चेहरा खलिस्तानी झेंड्याने झाकून टाकत त्यांना धक्काबुक्की केली. शिवाय, वार्तांकन केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला. पोलिसांनी हस्तक्षेप केला असतानाही खलिस्तानवाद्यांनी पत्रकाराला शिवीगाळ करत जोरात काठी फेकून मारल्याने त्यांचा कान दुखावला गेला. पोलिसांनी तंबी दिल्यानंतरही भाषणांदरम्यान खलिस्तान समर्थक पत्रकाराच्या दिशेने बोट करून त्याला धमक्या देत होते. भारतीय दूतावासाने पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा निषेध केला.