इस्राईलने राफामध्ये माजवला हाहाकार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

तेल अविव- पाच महिन्यानंतर हमासने इस्राइलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. याला इस्राइलने प्रत्युत्तर दिलं आहे. इस्राइलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये राफामधील ३५ लोकांना मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. पॅलेस्टाईन आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने सीएनएनने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्राइल लष्कराने मोठ्या प्रमाणात राफा शहरावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. राफामध्ये प्रामुख्याने शरणार्थी छावण्यात पॅलिस्टिनी लोक राहत आहेत. अशाच छावण्यांवर इस्राइलने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यात ३५ जणांचा मृत्यू झालाय. पॅलेस्टाईनच्या दाव्यानुसार, यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

इस्राइलने दावा केलाय की, 'आमच्या टीमला गुप्त माहिती मिळाली होती की, छावण्यांमध्ये वेस्ट बँकचा हमासचा कमांडर याच्यासह अनेक अतिरेकी लपून बसले होते. हल्ल्यामध्ये यांचा खात्मा झाला आहे'. दुसरीकडे, हमासने दावा केलाय की, 'शरणार्थी लोक राहत असलेल्या छावण्यांवर हा हल्ला झाला आहे. इस्राइल सैन्याने अशा ठिकाणांवर हल्ला केलाय जिथे १५ दिवसांपूर्वी सामान्य लोकांनी हल्ल्यांपासून बचावासाठी आश्रय घेतला होता.'

पॅल्स्टाईन मंत्रालयाने म्हटल्यानुसार, 'राफामधील हॉस्पिटलमध्ये आता नव्या रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे या हल्ल्यामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्या लोकांना कुठे दाखल करायचे हा प्रश्न निर्माण झाला हातो.' इस्राइलने केलेल्या हल्ल्यांच्या संदर्भात काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसत आहे. अग्निशमन दल आणि बचावपथक युद्धपातळीवर आपलं काम करत असल्याचं दिसत आहे.

इस्राइलने राफामध्ये काही प्रदेशांना सुरक्षित म्हणून जाहीर केलं होतं. त्यामुळे अनेकांनी अशा ठिकाणी आश्रय घेतला होता. अनेक स्थलांतरित लोक याठिकाणी राहत होते. पण, इस्राइल सैन्याकडून याच ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे, असं गाझातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. दुसरीकडे, इस्राइलचा याबाबत वेगळा दावा आहे. सामान्य लोकांच्या आडून हमास अशाच प्रदेशातून कार्यरत असल्याचं इस्राइलचं म्हणणं आहे.