रोमांचक आणि संवेदनशील असलेला 'आर्टिकल ३७०'

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 2 Months ago
 'आर्टिकल ३७०'
'आर्टिकल ३७०'

 

'उरी द सर्जिकल स्टाईक' हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे दिग्दर्शन आदित्य धरने केले होते. याला चांगले यश मिळाले होते. या चित्रपटामुळे अभिनेता विकी कौशलला स्टारडम प्राप्त झाले होते. आता याच आदित्य धरने निर्माता म्हणून 'आर्टिकल ३७०' हा चित्रपट आणलेला आहे. सत्य घटनेवरील या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे याने केले आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याच्या घटनेवर बेतलेला हा चित्रपट आहे. खरे तर हे कलम ३७० रद्द केल्याचे सगळ्यांना माहीत आहे; परंतु ते हटवण्यासाठी सरकारला काय काय करावे लागले... त्याबाबतीत कोणकोणत्या अडचणी होत्या.. कलम ३७० हटवण्यापूर्वी सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्य घटनेची तपासणी कशी केली... त्यानंतर हा ऐतिहासिक निर्णय कसा घेतला.. वगैरे सगळी माहिती या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

आदित्य धरने 'आर्टिकल ३७०'ची कथा लिहिली आहे. दिग्दर्शक आदित्य जांभळेने ही संवेदनशील कथा सुरेख पद्धतीने मांडली आहे. या चित्रपटाची कथा इंटेलिजेंट ऑफिसर जुनी हक्सर (यामी गौतम) च्या गुप्तचर मोहिमेपासून सुरू होते. जुनी तिचा वरिष्ठ अधिकारी खावर (अर्जुन राज) च्या परवानगीशिवाय दहशतवादी बुरहान वानीचा सामना करते. त्या चकमकीमध्ये बुरहान मारला जातो. त्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती कमालीची बिघडते. सगळीकडे जाळपोळ आणि दगडफेक होते. या बिघडलेल्या परिस्थितीला जुनीला जबाबदार धरले जाते आणि तिची बदली दिल्लीत केली जाते. इकडे दिल्लीमध्ये सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या हालचाली गुपचूप सुरू असतात. पीएमओ सचिव राजेश्वरी स्वामीनाथन (प्रिया मणी) यांचे याबाबतीत संशोधन सुरू असते. त्यांना काश्मीरमधील परिस्थितीची जाणीव असते आणि जुनीच्या कार्यक्षमतेवरदेखील त्यांचा विश्वास असतो. मग ती स्वतःची स्पेशल टीम बनविते आणि त्या टीमची प्रमुख म्हणून जुनीची निवड करते. तिला पुन्हा काश्मीरमध्ये पाठविले जाते. मग जुनीची एनआयए ही टीम काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकीकडे प्रयत्न करीत असते; तर दुसरीकडे दिल्लीत कलम ३७० रद्द करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असतात. अखेर हा ऐतिहासिक निर्णय घेतला जातो आणि चित्रपट तेथेच संपतो.

या चित्रपटाची कथा सहा भागांमध्ये विभागली गेली आहे. पहिला भाग हा दहशतवादी बुरहान वानीबरोबरची चकमक. त्यानंतर कथा हळूहळू पुढे सरकत जाते. मग काश्मीरमध्ये लावलेली राष्ट्रपती राजवट, पुलवामा येथील अतिरेकी हल्ला, त्यानंतर भारताने केलेला एअरस्ट्राईक आणि शेवटच्या भागामध्ये कलम ३७० रद्द केल्याचा ऐतिहासिक निर्णय अशा प्रकारे चित्रपटाच्या कथेची मांडणी करण्यात आली आहे. ही कथा पडद्यावर मांडताना लेखक आदित्य धर, मोनल ठाकूर आणि दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी खूप संशोधन केल्याचे दिसते. अगदी बारीकसारीक तपशिलाद्वारे त्यांनी ही कथा उत्तम प्रकारे मांडली आहे. त्यामुळे पाहताना ती अधिक रोमांचक आणि तितकीच संवेदनशील वाटते. यामी गौतम, प्रिया मणी, वैभव तत्त्ववादी, किरण करमरकर, असित रेडीज, इरावती हर्षे, अरुण गोविल, सुमित कौल आदी कलाकारांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. विशेष म्हणजे यामी गौतम आणि प्रिया मणी यांनी संपूर्ण चित्रपटाचा भार आपल्याच खांद्यावर घेतला आहे आणि त्यांनी आपापल्या भूमिका मोठ्या वकुबीने साकारल्या आहेत. पीएमओ सचिव बनलेल्या प्रिया मणी यांनी आपली ही भूमिका अधिक गांभीर्याने साकारली आहे. पंतप्रधानांच्या भूमिकेत अरुण गोविल आणि गृहमंत्र्यांच्या भूमिकेत किरण करमरकर यांनी सुरेख काम केले आहे. इरावती हर्षे यांनी पत्रकाराची भूमिका उत्तम निभावली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे संगीताला फारसा वाव नाही. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सुंदर झाली आहे आणि चित्रपटाचे पार्श्वसंगीतदेखील कथेच्या अनुषंगाने आहे. तरीही मध्यांतरानंतर चित्रपट काही ठिकाणी रेंगाळलेला वाटतो. त्यावेळी कथा मंदगतीने पुढे सरकताना दिसते. मात्र नंतर ती वेग घेते आणि क्लायमॅक्सला एका ऐतिहासिक निर्णयाने ती संपते. हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा झाला आहे. एका सत्य घटनेवरील रोमांचक आणि संवेदनशील असा हा चित्रपट आहे.