प्रेक्षकांना ओटीटीवरून चित्रपटगृहांकडे खेचून आणणारा बादशाह

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 2 Months ago
शाहरुख खान
शाहरुख खान

 

कोरोनामुळे आलेल्या निराशेला मागे टाकण्यासाठी बॉलिवूडला नवसंजीवनीची गरज होती. शाहरुख खानच्या रूपात बॉक्सऑफिसवर ‘त्सुनामी’ आली. यामुळे बॉलिवूडचे ‘अच्छे दिन’ पुन्हा सुरू झाले. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने २०२३ हे वर्ष सर्वार्थाने गाजवले. २०१४पासून बॉक्सऑफिसवर दणदणीत यशाला मुकलेल्या या ‘बादशहा’ने एका वर्षी तीन यशस्वी चित्रपट दिले.

पठाण, जवान या अ‍ॅक्शन चित्रपटांनी धुमाकूळ घातल्यानंतर डंकी या सामाजिक विषयावरील चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिकीट बारीवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला कमवणाऱ्‍या या चित्रपटांनी शाहरुख खानचे बॉलिवूडमधील स्थान कायम राखले. एकीकडे तिशीतले तरुण नायक प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यात अपयशी ठरत असताना, दुसरीकडे वयाच्या ५८व्या वर्षीही ‘सोलो’ हिरो म्हणून शाहरुख खान ठसा उमटवतो ही वाखाणण्याजोगी बाब होय.

कोरोनाच्या संसर्गामुळे २०२० व २०२१ ही दोन वर्षे बॉलिवूडसाठी वाईट गेली. २०२२मध्ये द कश्मीर फाईल्स, आरआरआर, केजीएफ चॅप्टर टू, भूलभूलैय्या २, कार्तिकेया २, कांतारा व दृष्यम २ या काही चित्रपटांनी आपले नाणे खणखणीत वाजवले. मात्र यापैकी एकाही चित्रपटाने भारतात ४०० कोटींचा किंवा जागतिक स्तरावर एक हजार कोटींचा गल्ला कमवला नाही.

कोरोनामुळे आलेल्या निराशेला मागे टाकण्यासाठी बॉलिवूडला नवसंजीवनीची गरज होती. शाहरुख खानच्या रूपात बॉक्सऑफिसवर ‘त्सुनामी’ आली. यामुळे बॉलिवूडचे ‘अच्छे दिन’ पुन्हा सुरू झाले.

झिरोकडून सपशेल निराशा
शाहरुख खानचा २०२३ आधी अखेरचा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आनंद एल. राय यांनी दिग्दर्शित केलेल्या झिरो नावाच्या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र बॉक्सऑफिसवर सपशेल निराशा झाली. यानंतर शाहरुख खानने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. याच कालावधीदरम्यान कोरोनामुळे जग ठप्प झाले. त्यामुळे त्याची विश्रांती आणखी वाढली.

घवघवीत यशापासून दूर
शाहरुख खानचा शेवटचा सुपरहिट चित्रपट होता चेन्नई एक्स्प्रेस. हा चित्रपट २०१३मध्ये आला होता. त्यानंतर आलेल्या हॅप्पी न्यू ईयर, दिलवाले, फॅन, रईस, जब हॅरी मेट सेजल आणि झिरो या चित्रपटांना यश मिळाले नव्हते. हॅप्पी न्यू ईयरने मोठी कमाई केली, पण हा चित्रपट फक्त नफा मिळवण्याच्या विभागात मोडला गेला.

कारण या चित्रपटाचे बजेट जास्त होते. रईस तगडी कमाई करू शकला असता. दमदार अभिनय, जबरदस्त संवाद, श्रवणीय गाणी, उत्तम दिग्दर्शन या चित्रपटाची जमेची बाजू होती. पण रईस आणि हृतिक रोशनचा काबिल एकाच वेळी प्रदर्शित झाल्यामुळे रईस हादेखील फक्त नफा कमवू शकला. एकूणच काय तर २०१४ ते २०२२ या दरम्यान शाहरुख खान घवघवीत यशापासून दूरच राहिला होता.

मास्टरप्लॅन
शाहरुख खानने कोरोनामुळे वाढलेल्या ‘ब्रेक’चा फायदा घेतला. सिनेसृष्टीत झोकात पुनरागमन करण्यासाठी मास्टरप्लॅन केला गेला. यशराज बॅनर म्हणजेच यशाची गॅरंटी, एटली कुमार म्हणजे दक्षिणेतील सिनेप्रेमींचीही पावले चित्रपटगृहाकडे वळवण्याची हमी आणि बॉक्सऑफिस व तुफान यश हे समीकरण अर्थातच राजकुमार हिरानी या तीन महत्त्वाच्या घटकांसोबत हातमिळवणी करीत शाहरुख खान याने डंका वाजवला.

‘पठाणी’ वसुली
शाहरुख खानने चार वर्षांनंतर पुनरागमनासाठी यशराज बॅनरची निर्मिती असलेला व सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण हा चित्रपट स्वीकारला. जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण, आशुतोष राणा, डिंपल कपाडिया अशी दिग्गज कलाकारांची फौज व सलमान खानचा छोटासा रोल असलेल्या चित्रपटाने किंग खानचे तख्त राखले.

शाहरुख खानने पहिल्यांदाच परिपूर्ण अ‍ॅक्शन चित्रपट करीत सिनेप्रेमींना आपल्याकडे खेचून घेतले. शाहरुख खानला स्वतःलाही मोठ्या हिट सिनेमाची प्रतीक्षा होती. बॉलिवूडमधील स्थान कायम राखण्यासाठी पठाणला यश मिळणे तेवढेच महत्त्वाचे होते.

‘स्पाय एजंट’च्या धर्तीवर असणाऱ्‍या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच विक्रमी कमाई केली. तिकीट खिडकीवर हाऊसफुलचे फलक झळकले. यानंतर भावुक झालेल्या शाहरुख खानने सोशल माध्यमावर मनातील भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे, त्यांचे मनोरंजन करणे हेच आमचे ध्येय आहे. ...पठाण चित्रपटावर प्रेम करणाऱ्यांना मनापासून धन्यवाद. मेहनत, लगन और भरोसा अभी जिंदा है... हे पुन्हा सिद्ध झाले. जयहिंद...

जवानला सॅल्यूट
एटलीच्या जवान चित्रपटात बहुतांशी आर्टिस्ट दक्षिणेकडील होते. कोरोना काळात या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेण्यात आली होती. दक्षिणेतील मंडळी थेट मुंबईत येऊन काम करीत होती. शाहरुख खानने या चित्रपटात वडील - मुलगा अशी दुहेरी व्यक्तिरेखा साकारली. दोन्ही व्यक्तिरेखांचे भरभरून कौतुक झाले. एटलीच्या दिग्दर्शनाचीही स्तुती झाली.

नयनतारा, दीपिका पदुकोण, विजय सेतुपथी यांचा अभिनयही वाखाणण्याजोगा ठरला. एटली व शाहरुख खान यांनी या चित्रपटात अनिरुद्ध रवीचंदर या युवा संगीतकाराला संधी दिली. त्यानेही मिळालेल्या संधीचे सोने केले.

कमी बजेटचा डंकी प्रभावी
शाहरुख खानच्या पठाण व जवान या दोन चित्रपटांनी तुफानी यश मिळवले होते. त्यामुळे साहजिकच ख्रिसमसच्या कालावधीत प्रदर्शित झालेल्या डंकीकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या. पण चित्रपटाचा सामाजिक विषय आहे, हे राजकुमार हिरानी व शाहरुख खान यांना चांगलेच माहीत होते. त्यामुळे पहिल्या दिवसापासून मोठी कमाई होईल याची अपेक्षा त्यांनी बाळगली नव्हती. अन् झालेही तसेच.

मात्र २१ डिसेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने २ जानेवारीपर्यंत भारतात १९८ कोटी, तर जागतिक स्तरावर ४०० कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाचा बजेट १२० कोटींचे आहे. याचा अर्थ शाहरुख खानचा हा चित्रपट नफा तसेच हिटच्या कॅटेगरीच्या विभागात नक्कीच येऊ शकतो.

महत्त्वाच्या बाबींवर नजर
कोरोनाच्या काळात भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना घरी बसून वेबसीरीज पाहण्याचे वेड लागले होते. त्यामुळे चित्रपटगृहे रिकामी पडली होती. पण शाहरुख खानच्या चित्रपटांनी लोकांना सिनेमागृहाकडे पुन्हा खेचण्यात यश मिळवले. चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुल्लचे फलक प्रदीर्घ कालावधीनंतर पाहायला मिळाले. सिनेमागृहात संवाद, गाण्यांवर शिट्या ऐकायला मिळाल्या.

पठाण व डंकी हे दोन चित्रपट प्रजासत्ताक दिन व ख्रिसमस या दोन सणांच्या किंवा सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झाले होते. पण जवान हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा कोणताही मोठा सण नव्हता. तरीही त्याने बक्कळ कमाई केली. याचा अर्थ एक उत्तम सिनेमा केला तर प्रेक्षक सिनेमागृहात येते. यासाठी सण किंवा विकेंडची गरज नाही, हे शाहरुख खानच्या या चित्रपटाने दाखवून दिले.

बॉलिवूडला पुन्हा सोन्याचे दिवस
दिग्दर्शक अनुराग कश्‍यप यांनीही शाहरुख खानच्या पठाण, जवान यांच्या तुफान यशाचे मनभरून कौतुक केले. ते म्हणाले, २०२३ हे वर्ष बॉलिवूडसाठी चांगले गेले. कोरोनाच्या काळात सिनेमागृहे बंद होती. त्यानंतर बॉलिवूडला एका मोठ्या हिट चित्रपटाची आवश्‍यकता होती. शाहरुख खानच्या दोन चित्रपटांनी बॉलीवूडला पुन्हा सोन्याचे दिवस दाखवले. प्रेक्षक, डिस्ट्रिब्युटर्स, स्टु़डिओ सर्वच खूश झाले.
 
- जयेंद्र लोंढे