'ग्रॅमी' पुरस्कारामध्ये भारताचे 'शक्ती' प्रदर्शन

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 5 Months ago
ग्रॅमी पुरस्कार विजेते उस्ताद झाकीर हुसैन, संगीतकार आणि गायक शंकर महादेवन, गिटारवादक जॉन मॅकलॉलिन आणि तालवाद्यवादक व्ही. सेल्वागणेश
ग्रॅमी पुरस्कार विजेते उस्ताद झाकीर हुसैन, संगीतकार आणि गायक शंकर महादेवन, गिटारवादक जॉन मॅकलॉलिन आणि तालवाद्यवादक व्ही. सेल्वागणेश

 

भारतीय संगीत क्षेत्रासाठी सोमवारची सकाळ सुवार्ता घेऊनच उगवली. प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन आणि संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांच्या 'शक्ती' बँडने यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरले. 'शक्ती'च्या 'धिस मोमेंट' या गाण्यांच्या अल्बमला सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बमचा पुरस्कार मिळाला. याशिवाय बासरीवादक राकेश चौरसिया यांनाही 'ग्रॅमी'ने सन्मानित करण्यात आले. एकूण पाच भारतीय कलाकारांची छाप या सोहळ्यावर उमटली.

संगीतातील सर्वोच्च ६६व्या ग्रॅमी पुरस्कारांचे वितरण लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम एरिना येथे भारतीय वेळेनुसार आज सकाळी साडेसहाच्या सुमारास झाले. प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट, मिली सायरस, बिली इलिश, किलर माइक आदी जगप्रसिद्ध गायकही वेगवेगळ्या गटांत विजेते ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जस्टिन ट्रॅटर यांनी केले. झाकीर हुसेन, शंकर महादेव, ज्येष्ठ गिटारवादक जॉन मॅकलॉलिन, तालवाद्यवादक व्ही. सेल्वागणेश आणि व्हायोलिनवादक गणेश राजगोपालन अशा दिग्गज कलावंतांनी घिस मोमेंट' या अल्बमची निर्मिती केली आहे. 'सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम' या गटामध्ये 'शक्ती' चे बाजी मारली. शंकर महादेवन आणि त्यांचे सहकारी ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते. या गटात सुसाना बाका, बोंकाटे, बर्ना बॉय आणि डेव्हिडो या कलाकारांना नामांकन मिळाले होते. 

झाकिर हुसेन यांचा तिहेरी गौरव
ग्रॅमी पुरस्कारांमध्ये झाकिर हुसेन यांना तीन पुरस्कार मिळाले आहेत, तर ज्येष्ठ बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे राकेश चौरसिया यांना दुहेरी यश मिळाले आहे. या दोघांच्या एकत्रित 'पश्तो' या गाण्यासाठी सर्वोत्तम जागतिक संगीत सादरीकरणासाठी गौरविण्यात आले, तसेच 'अॅज वुई स्पिक'लाही 'सर्वोत्कृष्ट समकालीन वाद्य अल्बम' या गटात पुरस्कार मिळाला आहे. या दोन्ही गाण्यांमध्ये त्यांच्यासह एडगर मेयेर, बेला फ्लेक यांचा सहभाग आहे.