भारताच्या 'ऑल वी इमॅजिन ॲज लाईट'ने रचला इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 2 Months ago
ग्रँड प्रिक्स पुरस्कार स्वीकारताना छाया कदम, पायल कपाडिया, दिव्या प्रभा, कानी कुसरूती
ग्रँड प्रिक्स पुरस्कार स्वीकारताना छाया कदम, पायल कपाडिया, दिव्या प्रभा, कानी कुसरूती

 

यंदा कान चित्रपट महोत्सवात (Cannes 2024) भारतीय चित्रपटांचा डंका वाजलेला बघायला मिळत आहे. पायल कपाडिया (Payal Kapadia) ही कान चित्रपट महोत्सवामध्ये ग्रँड प्रिक्स पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माती ठरली आहे. पायलच्या 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' (All We Imagine as Light) या चित्रपटाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार देण्यात आला आहे.

अमेरिकन अभिनेता व्हायोला डेव्हिस यांच्या हस्ते पायल कपाडियाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार जिंकल्यानंतर दिलेल्या स्पिचमध्ये पायल म्हणाली, "कनी कुसरुती, दिव्या प्रभा आणि छाया कदम यांचे मी आभार मानते. त्यांच्याशिवाय चित्रपट शक्य झाला नसता."

मुंबईत राहणाऱ्या दोन केरळ परिचारिकांची कथा 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवातील मुख्य स्पर्धेत भाग घेणारा ३० वर्षांतील पहिला भारतीय चित्रपट ठरला. मुख्य स्पर्धेसाठी निवडला जाणारा "स्वाहम" हा याआधीचा भारतीय चित्रपट होता. हा चित्रपट 1994 मध्ये रिलीज झाला होता.

यंदा कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांची जादू दिसली. गुरुवारी, FTII चे विद्यार्थी चिदानंद एस. नाईक यांच्या “सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो...” या चित्रपटाला ला सिनेफ प्रथम पारितोषिक मिळाले.