सलमानच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 14 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अभिनेता सलमान खान याच्या राहत्या घरावर आज दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी एक दुचाकी जप्त केली आहे. यासंबंधी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याची पोस्ट 'फेसबुक'वर व्हायरल झाली आहे. या घटनेनंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

गोळीबाराची घटना पहाटे पाच वाजता घडली. तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, दोघांनी घराच्या बाल्कनीच्या दिशेने बंदुकीच्या तीन फैरी झाडल्या. घटना घडली तेव्हा सलमान घरातच होता. 

त्याचे कुटुंबीयदेखील घरात होते. या घटनेनंतर तातडीने मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानसोबत फोनवरून संवाद साधला, तसेच सुरक्षेसंदर्भात त्याला दिलासाही दिला. मुंबई पोलिसांची चर्चा करून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 'पोलिसांच्या तपासातून खरी माहिती समोर येईल. त्यामुळे पोलिसांचा तपास होईपर्यंत यावर काही सांगता येणार नाही,' असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. खासदार

संजय राऊत यांनी मात्र फडणवीसांवर निशाणा साधला. 'महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे आणि गृहमंत्री राजकारण करण्यात व्यग्र आहेत,' अशी टीका राऊत यांनी केली. यापूर्वी मार्च २०२३ मध्ये सलमान खानच्या वांद्रे येथील ऑफिसमध्ये एक ई- मेल आला होता, ज्यामध्ये त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि आणखी एकाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. गुन्हे शाखेने राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती.

हल्ल्यामागे बिश्नोई टोळी ?
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली असल्याबाबतची 'फेसबुक' पोस्ट व्हायरल झाली आहे. 'सलमान खान याला ही शेवटची वॉर्निंग होती. पुढच्या वेळी गोळी घरावर झाडली जाणार नाही. मला फारसे बोलायची सवय नाही. सलमान खान, आम्ही तुला हे फक्त ट्रेलर दाखवण्यासाठी केले आहे, आता तुला आमची ताकद समजेल.'