केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट'च्या वीरांचा केला गौरव
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सीआरपीएफ, छत्तीसगड पोलीस, डीआरजी आणि कोब्रा जवानांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. "करेगुट्टा टेकडीवर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाईत, शूर जवानांनी शौर्य दाखवून ही मोहीम यशस्वी केली. सर्व सुरक्षा दलांच्या जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन," असे शहा म्हणाले.
यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा हेही उपस्थित होते. गृहमंत्री म्हणाले की, "'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' दरम्यान जवानांनी दाखवलेले शौर्य आणि पराक्रम नक्षलविरोधी मोहिमेच्या इतिहासात सुवर्ण अध्यायाच्या रूपात स्मरणात राहील."
अमित शहा यांनी सांगितले की, "मोदी सरकार तोपर्यंत शांत बसणार नाही, जोपर्यंत सर्व नक्षलवादी शरण येत नाहीत, पकडले जात नाहीत किंवा संपवले जात नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारताला नक्षलमुक्त करू."
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, उष्णता, उंची आणि प्रत्येक पावलावर आयईडीचा धोका असूनही, सुरक्षा दलांनी मोठ्या उत्साहाने ही मोहीम यशस्वी केली आणि नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. त्यांनी सांगितले की, करेगुट्टा टेकडीवर नक्षलवाद्यांनी तयार केलेला साहित्याचा साठा आणि पुरवठा साखळी छत्तीसगड पोलीस, सीआरपीएफ, डीआरजी आणि कोब्राच्या जवानांनी शौर्याने नष्ट केली.
अमित शहा म्हणाले की, नक्षलवाद्यांनी देशातील कमी विकसित भागांचे मोठे नुकसान केले आहे, शाळा, रुग्णालये बंद केली आणि सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. ते म्हणाले की, नक्षलविरोधी मोहिमांमुळे पशुपतिनाथ ते तिरुपतीपर्यंतच्या परिसरातील ६.५ कोटी लोकांच्या जीवनात नवी पहाट झाली आहे. शहा म्हणाले की, नक्षलविरोधी मोहिमेत गंभीर शारीरिक इजा झालेल्या सुरक्षा दलाच्या जवानांचे जीवन सुखकर करण्यासाठी मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांनी सांगितले की, मोदी सरकार ३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादातून मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे.