इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम लागू होऊन काही दिवस उलटत नाहीत, तोच गाझा पट्टी पुन्हा एकदा हवाई हल्ल्यांनी हादरली आहे. युद्धविराम सुरू झाल्यापासून इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत किमान ९७ पॅलेस्टिनी ठार झाले असून २३० जण जखमी झाले आहेत, असा गंभीर आरोप गाझा सरकारने केला आहे. इस्रायलने आतापर्यंत ८० वेळा युद्धविराम कराराचा भंग केला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
या ताज्या हल्ल्यांमुळे, मोठ्या प्रयत्नांनी झालेला शांतता करार धोक्यात आला आहे. गाझा शहरातील एका हल्ल्यात एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तसेच, जबालियामध्ये आपल्या घराची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका प्रसिद्ध पशुवैद्यकीय डॉक्टरचाही इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला.
इस्रायली लष्कराने मात्र हमासवर युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. हमासने हल्ला केल्यामुळे, त्याला प्रत्युत्तर म्हणून हवाई हल्ले करण्यात आले, असे इस्रायलचे म्हणणे आहे. हमासने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
या सर्व तणावाच्या परिस्थितीत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "गाझामधील युद्धविराम अजूनही कायम आहे आणि अमेरिका परिस्थिती 'अत्यंत शांततापूर्ण' ठेवण्यासाठी काम करत आहे."
या संघर्षामुळे गाझामधील मानवतावादी संकट अधिकच गडद झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी गाझा शहरातील विद्ध्वंसाची पाहणी केली असून, या शहराच्या पुनर्बांधणीसाठी ५० अब्ज डॉलर्स खर्च येईल, असा अंदाज आहे. दरम्यान, सततच्या हल्ल्यांमुळे गाझामधील नागरिकांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.