पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना श्रीमद्भगवद्गीता भेट देताना
काळाचे चक्र कसे फिरते याचे उत्तम उदाहरण आज भारत आणि रशियाच्या संबंधात पाहायला मिळाले. एक काळ असा होता, जेव्हा रशियामध्ये एका पवित्र ग्रंथाला 'अतिरेकी साहित्य' ठरवून त्यावर बंदी घालण्याची मागणी झाली होती. आज त्याच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना तोच ग्रंथ अतिशय सन्मानाने भेट दिला. तो ग्रंथ म्हणजे 'श्रीमद्भगवद्गीता'.
ही घटना २०११ मधील आहे. रशियाच्या सायबेरियातील 'टॉमस्क' शहरात एक विचित्र खटला सुरू होता. तिथल्या सरकारी वकिलांनी दावा केला होता की, इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांनी रशियन भाषेत अनुवादित केलेली 'भगवद्गीता अॅज इट इज' हे पुस्तक जहाल आहे. हा ग्रंथ वाचल्याने समाजात द्वेष पसरतो आणि लोकांमध्ये वितुष्ट निर्माण होते, असे त्यांचे म्हणणे होते. थोडक्यात त्यांनी गीतेला 'एक्स्ट्रिमिस्ट लिटरेचर' म्हणजेच अतिरेकी साहित्य म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.
ही बातमी भारतात पोहोचताच संतापाची लाट उसळली. भारतीय संसदेत गदारोळ झाला. रशियातील हिंदू समाज आणि जगभरातील भारतीयांनी याला कडाडून विरोध केला. जो ग्रंथ हजारो वर्षांपासून जगाला कर्माचा आणि शांततेचा संदेश देतोय, तो 'अतिरेकी' कसा असू शकतो, हा प्रश्न सर्वांना पडला होता.
प्रदीर्घ सुनावणीनंतर रशियन कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला. न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, गीतेमध्ये असे काहीही नाही ज्यामुळे द्वेष पसरेल. उलट हा ग्रंथ मानवी मूल्यांची शिकवण देतो. कोर्टाने बंदीची ती याचिका फेटाळून लावली होती. आणि आता २०२५ साल उजाडले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले आहेत. या भेटीत एक वर्तुळ पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना खास रशियन भाषेत अनुवादित केलेली 'भगवद्गीता' भेट दिली.
आज हाच ग्रंथ दोन महासत्तांमधील मैत्रीचा सर्वात मोठा दुवा बनला आहे. २०११ मधील तो खटला ते २०२५ मधील ही सन्मानाची भेट, हा प्रवास थक्क करणारा आहे. ही ऐतिहासिक घटना दोन देशांमधील बदलत्या संबंधांची आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची साक्ष देते.