रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्धाबाबत अत्यंत कठोर शब्दांत इशारा दिला आहे. जोपर्यंत रशिया आपली ठरवलेली उद्दिष्टे साध्य करत नाही, तोपर्यंत ही लष्करी मोहीम थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. चार वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आलेल्या पुतिन यांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत आपली भूमिका मांडली.
पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "रशियाने युक्रेन युद्ध सुरू केलेले नाही. पाश्चिमात्य देशांच्या प्रभावाखाली येऊन युक्रेनने ज्या कृती केल्या, त्यामुळे रशियाला या संघर्षात ओढले गेले. हे युद्ध आता जवळपास चार वर्षांपासून सुरू आहे."
आपल्या युद्धाचा अंतिम टप्पा (Endgame) काय असेल, हे स्पष्ट करताना पुतिन म्हणाले, "रशियाची उद्दिष्टे पूर्ण झाल्यावरच, ज्यामध्ये डोनबास प्रदेशाला मुक्त करणे समाविष्ट आहे, हे युद्ध संपेल. आमची विशेष लष्करी मोहीम ही युद्धाची सुरुवात नाही, तर युक्रेनमधील राष्ट्रवाद्यांचा वापर करून पश्चिमेने जी आग लावली आहे, ती विझवण्याचा हा एक प्रयत्न आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, या सगळ्याचा अर्थ एकाच गोष्टीशी येऊन थांबतो - एक तर आम्ही आमचा प्रदेश बळाचा वापर करून परत घेऊ किंवा युक्रेनच्या सैन्याला तिथून माघार घ्यावी लागेल.
रशियन हितसंबंधांचे रक्षण
दोन्ही देशांमधील वैराची कारणे सांगताना पुतिन यांनी युक्रेनवर गंभीर आरोप केले. युक्रेनने अनेक प्रदेशांमध्ये रशियन भाषेवर बंदी घालून आणि लोकांना मंदिरे व चर्चमधून हुसकावून लावून रशियन हितसंबंधांना बाधा पोहोचवली आहे, असे ते म्हणाले.
पुतिन यांनी ठामपणे सांगितले की, रशिया आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. "रशिया आपल्या लोकांचे, तिथे राहणाऱ्या नागरिकांचे आणि आपल्या पारंपरिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. रशियन भाषा आणि संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही नक्कीच सर्व काही करू," असे त्यांनी स्पष्ट केले. युक्रेनने रशियन ऑर्थोडॉक्स चर्चवर बंदी घातली असून अनेक चर्च जप्त केले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
२०१४ चे बंड आणि पश्चिमेचा हात
मुलाखतीत पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "पश्चिमेकडील देश युक्रेन युद्धाला कारणीभूत ठरलेल्या घटनांचा कधीच उल्लेख करत नाहीत. २०१४ मध्ये युक्रेनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी पश्चिमेने कट रचला आणि त्याला पाठिंबा दिला. तीच खरी ठिणगी होती. त्यानंतर क्रिमिया आणि आग्नेय युक्रेनमधील डोनबासमध्ये घटना घडल्या. पण याचा सोयीस्कर विसर पडला जातो."
रशियाने हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला यश आले नाही. त्यामुळे देशाकडे युद्धाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता, असे पुतिन यांनी सांगितले. डोनबास भागातील नागरिकांवर आठ वर्षे सतत हिंसाचार झाला, ज्याबद्दल पश्चिमेने चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे आम्हाला त्या प्रजासत्ताकांना मान्यता देणे आणि मदत करणे भाग पडले, असे समर्थन त्यांनी केले.
पुतिन यांचे भारतात जंगी स्वागत
रशिया-युक्रेन युद्धानंतर व्लादिमीर पुतिन यांची ही पहिलीच भारत भेट आहे. विमानतळावर त्यांचे पारंपरिक नृत्याने आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, विमानतळावरून निघताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन एकाच गाडीतून रवाना झाले. ४ आणि ५ डिसेंबर असे दोन दिवस ते भारतात असणार आहेत.