इराण युद्धात अमेरिकेने पहिल्या ४८ तासांतच फुंकले तब्बल ५१ हजार ४०० कोटी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणवरील लष्करी कारवाईच्या पहिल्या दोन दिवसांतच तब्बल ५.६ अब्ज डॉलर्सची (सुमारे ५१,४०० कोटी रुपये) शस्त्रास्त्रे वापरली आहेत. 'वॉशिंग्टन पोस्ट'च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. हा आकडा केवळ सुरुवातीच्या टप्प्यात वापरलेल्या शस्त्रास्त्रांचा आहे. यात सैन्य, विमाने किंवा नौदलाच्या तैनातीवरील अवाढव्य खर्चाचा अजिबात समावेश नाही.

या प्रचंड खर्चामुळे अमेरिकेच्या संसदेत चिंता व्यक्त केली जात आहे. इराण युद्धाचा अमेरिकेच्या लष्करी सज्जतेवर वेगाने परिणाम होत असल्याचा धोका निर्माण झाला आहे. हे युद्ध पेंटागॉन किती काळ ताणून नेऊ शकेल, असा प्रश्न लोकप्रतिनिधी विचारत आहेत. दोन्ही देशांनी केलेल्या दाव्यांपेक्षा या युद्धाचे स्वरूप आता पूर्णपणे वेगळे वळण घेत आहे.

ट्रम्प प्रशासनाची भूमिका

इराणवरील कारवाईमुळे अमेरिकेच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा वेगाने संपत चालला आहे, ही चिंता ट्रम्प प्रशासनाने फेटाळून लावली आहे.

पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते शॉन पारनेल यांनी 'द पोस्ट'ला याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, "राष्ट्राध्यक्षांनी ठरवलेल्या कोणत्याही वेळी, ठिकाणी आणि मुदतीत कोणतीही मोहीम फत्ते करण्यासाठी संरक्षण विभागाकडे सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत."

२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धात अमेरिकन लष्कराने शेकडो महागडी शस्त्रे वापरली आहेत. यामध्ये प्रगत 'एअर डिफेन्स इंटरसेप्टर' आणि 'टोमाहॉक' क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. संपूर्ण मध्यपूर्वेतील लष्करी कारवायांवर लक्ष ठेवणार्‍या 'यूएस सेंट्रल कमांड'ने याविषयी आकडेवारी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारीच्या हल्ल्यापासून इराणमधील पाच हजारांहून अधिक लक्ष्यांवर दोन हजारांहून अधिक शस्त्रास्त्रांचा मारा करण्यात आला आहे.

इराणमधील ही लष्करी मोहीम सुरू ठेवण्यासाठी ट्रम्प प्रशासन या आठवड्यात संसदेत एक पूरक संरक्षण बजेट मांडणार आहे. हे बजेट अब्जावधी डॉलर्सचे असू शकते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

मात्र, या बजेटला अनेक डेमोक्रॅटिक नेत्यांकडून तीव्र विरोध होण्याची दाट शक्यता आहे. हे नेते ट्रम्प यांना इराणमध्ये आणखी लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.

युद्धाचा शेवट अनिश्चित

इराणमधील हे युद्ध किती काळ चालणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी या कारवाईला एका महिन्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो असे म्हटले होते. पण सोमवारी 'सीबीएस न्यूज'शी बोलताना त्यांनी ही मोहीम "जवळपास पूर्ण झाली आहे", असा दावा केला.

अमेरिकेच्या 'कमांडर-इन-चीफ'ना २८ फेब्रुवारीच्या हल्ल्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर इराणमधील राजवट कोसळेल, असा त्यांचा अंदाज होता. किंवा व्हेनेझुएलासारखी परिस्थिती निर्माण होऊन तिथले व्यावहारिक अधिकारी वॉशिंग्टनला सहकार्य करतील, अशी अमेरिकेला आशा होती. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

पण यापैकी काहीही घडले नाही. उलट, तेहरानने खामेनी यांचा मुलगा मोजताबा खामेनी याची नवा सर्वोच्च नेता म्हणून निवड केली आहे. मोजताबा याने वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. इराणमध्ये आतापर्यंत इस्लामिक प्रजासत्ताकाला आव्हान देणारा कोणताही मोठा अंतर्गत उठाव झालेला नाही.

विध्वंसक हल्ले होऊनही तेहरानने आपली ताकद टिकवून ठेवली आहे. मध्यपूर्वेतील अमेरिकन तळ, इस्रायल आणि अमेरिकेचे आखाती मित्र देश (जसे सौदी अरेबिया आणि कतार) यांच्या प्रमुख शहरांवर हल्ला करण्याची इराणची क्षमता आजही शाबूत आहे. इराणने 'होर्मुझची सामुद्रधुनी' अडवून ठेवली आहे. जगातील एक पंचमांश तेल आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस याच सागरी मार्गावरून जातो.

संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत, कतार आणि सौदी अरेबियामधील विमानतळ, ऊर्जा प्रकल्प, हॉटेल्स, बंदरे आणि डेटा सेंटर्सवर जोरदार हल्ले करण्याचा इराणचा डाव होता. याद्वारे आखाती देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आखाती देशांच्या राजेशाहीने ट्रम्प यांच्यावर इराणच्या अटींनुसार युद्धबंदीसाठी दबाव आणावा, हा यामागील मुख्य उद्देश होता. पण हा कटही यशस्वी झाला नाही.

आतापर्यंत आखाती देशांनी अनपेक्षित असा भक्कम प्रतिकार दाखवला आहे आणि जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी इराणचे बहुतांश ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे पाडली आहेत. यामुळे मोठा अनर्थ टळला.

रणनीतीत मोठा बदल

युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत नेमकी किती आणि कोणत्या प्रकारची शस्त्रे वापरली गेली, हे अमेरिकेने अधिकृतपणे सांगितलेले नाही. पण ५.६ अब्ज डॉलर्सचा आकडा हे हल्ले किती महागडे होते, याची साक्ष देतो. आता मात्र या रणनीतीत बदल होत आहे.

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी गेल्या आठवड्यात याविषयी माहिती दिली. इराणच्या हवाई क्षेत्रावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर आता अचूक मारा करणाऱ्या महागड्या शस्त्रास्त्रांचा वापर कमी केला जाईल. त्याऐवजी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या लेझर-गाईडेड बॉम्बचा वापर केला जाईल. अमेरिकन आणि इस्रायली सैन्य आता इराणच्या अंतर्भागात घुसण्याचा प्रयत्न करत आहे.

'सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज'मध्ये अमेरिकन शस्त्रास्त्रांच्या साठ्यावर लक्ष ठेवणारे मार्क कॅन्सियन यांनी 'द वॉशिंग्टन पोस्ट'ला महत्त्वाची माहिती दिली. दूर पल्ल्याच्या महागड्या शस्त्रास्त्रांचा वापर थांबवल्यामुळे प्रत्येक हल्ल्याचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. आधी प्रत्येक हल्ल्यासाठी लाखो डॉलर्स खर्च होत होते, तोच खर्च आता काही प्रकरणांमध्ये एक लाख डॉलर्सपेक्षाही कमी येईल.

ट्रम्प यांच्याकडून साधनसामग्री वळवण्यास सुरुवात

पेंटागॉनचा शस्त्रास्त्रांचा साठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे ट्रम्प प्रशासन इंडो-पॅसिफिक क्षेत्रासह जगाच्या इतर भागांतील लष्करी साधनसामग्री मध्यपूर्वेकडे वळवत आहे. जर अमेरिकेचा चीनसोबत संघर्ष झाला, तर पेंटागॉनकडील उच्च दर्जाच्या शस्त्रास्त्रांचा मर्यादित साठा अपुरा पडेल, अशी भीती अमेरिकन संसदेत अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती.

'द पोस्ट'च्या अहवालानुसार, पेंटागॉन दक्षिण कोरियातील 'टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स' प्रणालीचे काही भाग मध्यपूर्वेत हलवत आहे. इराणविरुद्धची संरक्षण फळी मजबूत करण्यासाठी इंडो-पॅसिफिक आणि इतर ठिकाणांहून प्रगत 'पॅट्रियट इंटरसेप्टर्स' देखील बोलावले जात आहेत.

मध्यपूर्वेत शस्त्रास्त्रांची तातडीची कमतरता निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला नाही. तर इराणने अचानक हल्ल्यांचे प्रमाण वाढवल्यास पूर्वतयारी असावी, म्हणून ही खबरदारी घेतली जात असल्याचे अहवालात नमूद केले आहे.




Latest News