फळविक्रेत्याचा मुलगा झाला CA; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अबरारने मिळवले यश
Story by आवाज़ मराठी | Published by Bhakti Chalak • 2 h ago
CA अबरार आळंद
जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते, हे कळंबमधील रामवाडी येथील अबरार आळंद याने सिद्ध करून दाखवले आहे. वालचंदनगरच्या आठवडी बाजारात फळांची विक्री करून कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या बापाच्या स्वप्नांना अबरारने आपल्या कष्टाने पंख दिले आहेत. देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी CA परीक्षा वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी उत्तीर्ण करत त्याने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर कष्टाने मात
अबरार आळंदचे वडील आयुब जंगबहादुर आळंद हे वालचंदनगर परिसरातील आठवडी बाजारात फळ विक्रीचा छोटासा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई गृहिणी आहेत. साध्या परिस्थितीत वाढलेल्या अबरारने सुरुवातीपासूनच सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने दररोज दहा ते बारा तास अभ्यास करून कठोर परिश्रम घेतले.
याविषयी बोलताना अबरारने आवाज-द-व्हॉईसला प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, "लहानपणापासूनच मी ठरवले होते की मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे आहे. साधारणपणे सातवी-आठवीत असताना हा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी माझा चुलत भाऊ CA करत होता आणि त्याच्याकडून प्रेरणा घेऊन मीही हा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला."
परीक्षेची तयारी ते मिळालेले यश
अबरारचे प्राथमिक शिक्षण वालचंदनगरमधील भारत चिल्ड्रन अकॅडमी येथे झाले. पुढे अकरावी-बारावीचे वाणिज्य शाखेतील शिक्षण पुण्यातील बीएमसीसी कॉलेजमध्ये झाले, तर बी. कॉमचे शिक्षण पुण्यातील एमएमसीसी कॉलेजमध्ये झाले. त्याने नोव्हेंबर २०२० मध्ये सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर मे २०२२ मध्ये इंटरमिजिएट परीक्षा पास केली. पुढे सन २०२५ मध्ये सीए फायनलचा पहिला ग्रुप उत्तीर्ण झाला आणि जानेवारी २०२६ मध्ये दुसरा ग्रुप उत्तीर्ण करत अखेर चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे स्वप्न साकार केले.
मिळालेल्या यशानंतर परीक्षेच्या तयारीबद्दल बोलताना अबरार म्हणाला की, "HSC परीक्षा संपल्यानंतर लगेचच मी CA फाऊंडेशनसाठी क्लासेस सुरू केले आणि तयारीला सुरुवात केली. त्या काळात कोविड महामारी असल्यामुळे मी घरातूनच अभ्यास करत होतो आणि माझी परीक्षा डिसेंबर 2020 मध्ये होती. मी CA फाऊंडेशन पहिल्याच प्रयत्नात 257/400 गुणांसह उत्तीर्ण झालो."
तो पुढे म्हणाला की, "त्यानंतर दोन आठवडे विश्रांती घेतल्यानंतर मी पुण्यात CA Intermediate साठी क्लासेस सुरू केले. पण 2021 मध्ये कोविडची दुसरी लाट आल्यामुळे क्लासेस पुन्हा ऑनलाइन झाले आणि मी परत घरी जाऊन तयारी केली, मात्र त्यावेळी यश मिळाले नाही. मग मी निकालाची वाट न पाहता पुन्हा अभ्यास सुरू केला. या मेहनतीचे फळ मला मे 2022 मध्ये मिळाले, जेव्हा मी CA Intermediate चे दोन्ही ग्रुप्स 411/800 गुणांसह उत्तीर्ण झालो."
कुटुंबाची साथ
अबरारच्या या यशामध्ये त्याचे आई-वडील, भाऊ-बहिणी, शिक्षक आणि मित्र यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्याने सांगितले. तसेच दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) पुणे शाखेमार्फत विद्यार्थ्यांना संगणक, संभाषण कौशल्य, स्किल डेव्हलपमेंट यांसारख्या विविध प्रशिक्षण सुविधा आणि तज्ञांचे मार्गदर्शन मिळत असल्याचा मोठा फायदा झाल्याचेही त्याने सांगितले.
अबरार म्हणाला, "CA Intermediate पास झाल्यानंतर मी तीन वर्ष CA क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. माझा CA चा अंतिम प्रयत्न मे 2025 मध्ये होता. त्यामुळे मी डिसेंबर 2024 मध्ये ऑफिसमधून स्टडी लीव्ह घेऊन तयारी सुरू केली. त्या वेळी माझ्या आई आणि बहिणीने माझ्या अभ्यासाला मदत व्हावी म्हणून पुण्यात येऊन राहण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मला घरचे जेवण आणि भावनिक आधार मिळेल. माझे वडील त्यांच्या कामामुळे पुण्यात येऊ शकले नाहीत, पण ते मधूनमधून आम्हाला भेटायला येत असत. त्या काळात ते एकटे राहत होते आणि आम्ही तिघे पुण्यात राहत होतो."
देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल १ मार्च २०२६ ला जाहीर झाला. या निकालामध्ये अबरार आळंद याने भरघोस यश मिळवले. अबरार म्हणतो, "निकाल जाहीर झाला त्यावेळी मला माझा भाऊ वसीम आळंद यांचा फोन आला आणि त्यांनी आनंदाने म्हटले की, हॅलो CA अबरार अय्युब अलंद, तुम्ही पास झाला आहात! त्यावेळचा माझा आनंद शब्दांत मांडता येणारा नव्हता.”
त्या खास दिवसाबद्दल बोलताना अबरार म्हणाला की, "निकालाच्या दिवशी रमजान चालू असल्यामुळे आम्ही सगळे रोजा ठेवला होता आणि निकाल साधारणपणे सायंकाळी ६.३० वाजता, म्हणजेच इफ्तारच्या वेळेच्या जवळ आला. आनंद इतका प्रचंड होता की माझ्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी सगळीकडे माझ्या यशाची बातमी सांगायला सुरुवात केली. त्या आनंदात त्यांनी इफ्तारसुद्धा पूर्ण करायचे विसरले, कारण माझ्या यशाच्या आनंदानेच त्यांची तहान आणि भूक अर्धी भागली होती."
कुटुंबातील यशाची परंपरा कायम
अबरार आळंदच्या कुटुंबात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमधील यशाची परंपरा आहे. त्याचा चुलत भाऊ वसीम आळंद हा देखील चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर दुसरे चुलत भाऊ आजम आळंद हे पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून कार्यरत आहेत. अबरारनेही या परंपरेला पुढे नेत कुटुंबाची परंपरा पुढे चालवली आहे.
एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अबरार आळंद याच्या यशामुळे मुस्लिम समाजातील तरुणांसमोर शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीचा आदर्श निर्माण झाला आहे. आर्थिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे अबरारने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -