संकटांवर मात करत सिनेसृष्टीत स्थान मिळवणारे अल्ताफ शेख

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख
दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख

 

भक्ती चाळक

तिसरी इयत्तेचा मराठीचा पेपर सुरू होता. हातात पेन धरलेल्या एका लहानग्या पोराच्या डोक्यात प्रश्नांची उत्तरे भिनण्याऐवजी भलतंच काहीतरी सुरु होतं. पेपरमधील ‘माझे स्वप्न’ या निबंधाच्या प्रश्नावर त्याने असे काही लिहून टाकले की, मास्तरही थक्क झाले. त्यावेळच्या ब्लैक एंड व्हाइट टीव्हीने त्या चिमुरड्याच्या मनात सिनेमाचे असे काही बीज रोवले की, पुढे जाऊन त्याने संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर हे अगदी छोटेसे गाव. त्या गावातील अल्ताफ दादासाहेब शेख हा चिमुरडा. वडिल सायकल रिपेरिंगचे काम करायचे आणि कपडे शिवयचे. अशा हलाखीच्या आणि गरिबीच्या वातावरणात वाढलेला हा मुलगा पुढे जाऊन यशस्वी दिग्दर्शक बनला. गरिबी, संघर्ष, समाजाचा विरोध आणि उपाशीपोटी काढलेले दिवस या सगळ्यांवर मात करत अल्ताफ यांनी चित्रपटसृष्टीत यश मिळवले आहे.
 

शंभर रुपयांची नोट घेऊन पुण्यात दाखल
घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने अल्ताफ यांनी दहावीपर्यंतचेच शिक्षण घेतले. सेंट्रिंगचे काम करणे, हॉटेलमध्ये काम करणे अशी पडेल ती कामे अल्ताफ यांनी केली. पण डोक्यात मात्र दिग्दर्शनाचे भूत बसले होते. वडिलांना जेव्हा त्यांनी आपल्या मनातली इच्छा सांगितली, तेव्हा वडिलांनी खिशातून फक्त शंभर रुपयांची नोट काढून त्याच्या हातात दिली. त्या काळी पुण्यातून मंगळवेढाला यायला ८५ रुपये तिकीट होते. उरलेले पैसे खिशात बाळगून हा तरुण पुण्याच्या दिशेने निघाला.

पुण्यात आल्यावर जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. मिळेल ते काम करत त्यांनी नाईट स्कूलमधून आपले शिक्षण सुरूच ठेवले. वडिलांच्या टेलरिंग व्यवसायाचे पुढे फॅशन बुटीकमध्ये रूपांतर करून त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला. पण लेखणीची जादू आणि दिग्दर्शनाची ओढ काही सुटत नव्हती.
 

कथा विकून जगण्याचा आधार 
पुण्यात कोणीही पाठीराखा नसताना स्वतःच्या हिमतीवर त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात जगण्यासाठी त्यांनी तब्बल १७ ते १८ सिनेमांच्या कथा वेगवेगळ्या निर्मात्यांना विकल्या. त्यावेळी नावापेक्षा दोन वेळच्या जेवणाची आणि राहण्याची सोय महत्त्वाची होती.

आपल्या त्या संघर्षाबद्दल सांगताना अल्ताफ म्हणतात, “तुला नावाची काय गरज आहे, तू कथा आम्हाला दे आणि पैसे घे, असे निर्माते मला म्हणायचे. पुण्यात मला सपोर्ट करायला कोणी नव्हते, त्यामुळे जगण्याच्या साधनासाठी मी माझ्या कथा विकून पैसे साठवत गेलो.”

‘वेडा BF’मुळे मिळाली ओळख 
२०११ मध्ये अल्ताफ यांचा विवाह फरहाना यांच्याशी झाला. त्यांच्या पत्नी महाराष्ट्र पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. लग्नानंतरही त्यांचे सिनेमाचे वेड कमी झाले नाही. अखेर त्यांनी २०१७ मध्ये ‘वेडा BF’ नावाचा चित्रपट काढला केला. 

 
हिंदू-मुसलमानांमधील सलोखा आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत, असा संदेश देणारा हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज झाला. या चित्रपटातील कव्वाली प्रसिद्ध गायक अल्ताफ राजा यांनी गायली होती, जी मराठीतील पहिलीच कव्वाली ठरली आणि तिची वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

या सिनेमॅटिक प्रवासाबद्दल सांगताना अल्ताफ शेख सांगतात, “मराठी चित्रपट सृष्टीत स्टार कोणीच नाही, इथे कथा हाच हिरो आहे. मातीशी जोडलेली आपली कला आहे आणि मी नेहमी ऑडियन्सला आपल्या अवतीभवती घडणारी कथा वाटावी, असाच प्रयत्न करतो.”

त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचा ‘धारावी कट्टा’ चित्रपट आला. पण लॉकडाऊनच्या काळात पुन्हा वाईट दिवस सुरु झाले. पोट भरण्यासाठी त्यांना झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचे कामही करावे लागले. मात्र जिद्द सोडली नाही. २०२३ मध्ये सांगोल्याचे ११ वेळा आमदार राहिलेले दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘कर्मयोगी आबासाहेब’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. हा सिनेमा प्रचंड गाजला. देशभरातून आणि परदेशातून त्याला तब्बल ११८ नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले. हिंदीत पहिली ‘धनगरी ओवी’ आणत त्यांनी पुन्हा एकदा गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नाव कोरले.
 

बायकोचा सपोर्ट
चित्रपटसृष्टीत संघर्ष करत असताना पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ती त्यांची पत्नी फरहाना शेख. त्यांच्या या सहकार्याविषयी बोलताना अल्ताफ शेख सांगतात, “माझ्या बायकोचा मला खूप मोठा सपोर्ट आहे. लग्नापासूनच तिचे एकच सांगणे होते की, तुमच्या कामातून समाजाला नेहमी सकारात्मक संदेश गेला पाहिजे.”

आज अल्ताफ शेख यांनी मराठी, हिंदी, कन्नड आणि तेलगू अशा विविध भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. इस्टर्न युरोपपासून ते दिल्लीपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांत त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. खिशात फक्त शंभर रुपयांची नोट घेऊन घराबाहेर पडलेला तो नंदेश्वर गावचा पोरगा आज आपल्या जिद्दीच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर सिनेसृष्टीचा दणकट दिग्दर्शक म्हणून दिमाखात उभा आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter