मध्यरात्रीपासून सुरू झालेली हजारो चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर सायंकाळी संपली आणि बॉलिवूडचा 'किंग' शाहरूख खान त्याच्या 'मन्नत' या निवासस्थानाच्या गॅलरीत अवतरला. सोमवारी ६१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शाहरूखला पाहण्यासाठी मन्नतबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. पांढरा टी-शर्ट आणि जीन्स अशा साध्या वेशात आलेल्या शाहरूखने आपल्या स्वाक्षरीच्या ढंगात हात पसरून आणि हात जोडून चाहत्यांचे आभार मानले.
यंदा मन्नतवर नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव शाहरूख मध्यरात्री चाहत्यांना भेटू शकला नव्हता. त्यामुळे चाहत्यांमध्ये काहीशी निराशा पसरली होती. मात्र, मन्नतच्या भिंतींवर निऑन दिव्यांच्या साहाय्याने चाहत्यांसाठी एक हस्तलिखित आभारपत्र प्रदर्शित करण्यात आले होते. सायंकाळी सुरक्षा व्यवस्था कडक असतानाही शाहरूखने चाहत्यांच्या भेटीची परंपरा कायम राखत ही खास भेट दिली.
कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
शाहरूखच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटातील "तू मिल जाये" हे पहिले रोमँटिक गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्यात शाहरूखसोबत दीपिका पदुकोण दिसत असून अरिजित सिंगने हे गाणे गायले आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात सुहाना खान, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी आणि अर्शद वारसी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी शाहरूखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अजय देवगण, करीना कपूर, अनिल कपूर आणि रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर शाहरूखसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे, 'एसआरके युनिव्हर्स' या फॅन क्लबच्या वतीने अनाथालयात अन्नधान्य आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप, विनामूल्य आरोग्य शिबिर आणि चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.