शाहरुख खान ६१ व्या वर्षात पदार्पण;'किंग' चित्रपटाचे नवे गाणे रिलीज होत चाहत्यांना सरप्राईज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
'किंग' चित्रपटाचे नवे गाणे रिलीज
'किंग' चित्रपटाचे नवे गाणे रिलीज

 

मुंबई 

बॉलिवूडचा 'किंग' अर्थात अभिनेता शाहरुख खान आज आपला ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिनानिमित्त त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील 'मन्नत' (Mannat) या निवासस्थानाबाहेर मध्यरात्रीपासूनच हजारो चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी देशभरातून आलेले चाहते 'मन्नत'बाहेर एकत्र आले असून, संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि सुरक्षेत वाढ

दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरुखच्या वाढदिवसाला 'मन्नत'बाहेर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांनी वांद्रे परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गाड्यांची तपासणी करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी सतत गस्त घालत आहेत. शाहरुख दरवर्षी आपल्या वाढदिवशी 'मन्नत'च्या गॅलरीतून चाहत्यांना अभिवादन करतो, त्यामुळे चाहते तासनतास त्याच्या आगमनाची वाट पाहत उभे आहेत.

'किंग' चित्रपटाचे सरप्राईज आणि वांद्रे-वरळी सी लिंकवर रोषणाई

वाढदिवसाचे औचित्य साधत शाहरुख खानच्या आगामी 'किंग' (King) या चित्रपटातील 'तू मिल जाए' हे पहिले गाणे रिलीज करण्यात आले असून, यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. याशिवाय, या खास प्रसंगी मुंबईतील आयकॉनिक वांद्रे-वरळी सी लिंकवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून शाहरुखने स्वतः रात्रीच्या वेळी ड्राईव्हला जाऊन या जगमगाटाचे दृश्य पाहिल्याचे सोशल मीडियावर शेअर केले आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'किंग' हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.