आंतरराष्ट्रीय टॅमरे बॉक्सिंग स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी; १४ पदकांसह पटकावले अव्वल स्थान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
फिनलँडमधील ४६ व्या आंतरराष्ट्रीय टॅमरे बॉक्सिंग स्पर्धेत पदके जिंकणारे भारतीय बॉक्सर
फिनलँडमधील ४६ व्या आंतरराष्ट्रीय टॅमरे बॉक्सिंग स्पर्धेत पदके जिंकणारे भारतीय बॉक्सर

 

नवी दिल्ली 

फिनलँडमधील टॅम्प्रे येथे पार पडलेल्या ४६ व्या आंतरराष्ट्रीय टॅमरे बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत पदकतक्त्यात अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत ४ सुवर्ण, २ रौप्य आणि ८ कांस्य पदकांसह एकूण १४ पदकांची कमाई केली.

आरती, अरुंधती, अंकुशिता आणि पवनचे सुवर्णयश

महिलांच्या ५४ किलो वजनी गटामध्ये आरती धारियाल हिने स्कॉटलंडच्या कर्नाचन स्टीफनचा ५-० असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर ७० किलो वजनी गटात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या अरुंधती चौधरीने आयर्लंडच्या इघारो एव्हलिनचा ३-२ असा पराभव केला. महिलांच्या ६५ किलो वजनी गटात अंकुशिता बोरोने इंग्लंडच्या थॉम्पस्टन एलाचा ४-१ असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात पवन बर्तवालनेही सुवर्ण कामगिरी केली.

रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई

पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात मोहम्मद हुसामुद्दीन आणि महिलांच्या ५७ किलो वजनी गटात जॅस्मिन यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याशिवाय विवेक मीना, हितेश, अक्षय, बोबिन चौहान, चेतन चौधरी, तनू, दिशा पाटील आणि इम्रोज खान यांनी आपापल्या वजनी गटात कांस्यपदके जिंकली. १९७७ पासून सातत्याने आयोजित केली जाणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कॅलेंडरमधील एक अत्यंत महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. ऑलिम्पिक वजनी गटातील उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यासाठी भारताने १४ सदस्यांचा संघ या स्पर्धेत उतरवला होता.