नवी दिल्ली
भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन चॅम्पियन ट्रॉफी २०२६ मध्ये आपल्या दमदार खेळाची चुणूक दाखवत चीनचा ५-२ अशा दणदणीत फरकाने पराभव केला आहे. या विजयासह भारताने स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि सुखजीत सिंह यांनी प्रत्येकी दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले, तर जुगराज सिंहने एक गोल केला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला. १२ व्या मिनिटाला सुखजीत सिंहने शानदार मैदानी गोल करत भारताचे खाते उघडले. मात्र, चीनच्या यांग पेंगने २६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत बरोबरी साधली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांकडून अटीतटीची टक्कर पाहायला मिळाली.
उत्तरार्धात भारतीय खेळाडूंनी सामन्याची सूत्रे पूर्णपणे आपल्या हातात घेतली. २७ व्या आणि ३१ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताची पकड मजबूत केली. पाठोपाठ ३४ व्या मिनिटाला सुखजीत सिंहने आपला दुसरा गोल करत स्कोर ४-१ केला. चीनकडून चेन चोंगकोंगने ३६ व्या मिनिटाला एक गोल करून अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला.
सामन्याच्या शेवटच्या क्वार्टरमध्ये ४७ व्या मिनिटाला जुगराज सिंहने आणखी एक पेनल्टी कॉर्नर घेत भारताचा स्कोर ५-२ केला. यानंतर चीनला सामन्यात पुनरागमन करण्याची कोणतीही संधी भारतीय खेळाडूंनी दिली नाही. यापूर्वी भारताने बांगलादेशचा १३-० असा पराभव केला होता. आता भारताचा पुढील सामना ३० ऑक्टोबर रोजी जपानविरुद्ध होणार आहे.