भारतीय तटरक्षक दलाने आंध्र प्रदेश किनारपट्टीवर अडकलेल्या २० खलाशांची केली सुटका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
आंध्र प्रदेश किनारपट्टीवर तटरक्षक दलाचे साहसी बचावकार्य; २० खलाशांचे प्राण वाचवले
आंध्र प्रदेश किनारपट्टीवर तटरक्षक दलाचे साहसी बचावकार्य; २० खलाशांचे प्राण वाचवले

 

नवी दिल्ली 

बंगालच्या उपसागरात धडकलेल्या 'अर्नब' (Cyclone Arnab) या तीव्र चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश किनारपट्टीवर निर्माण झालेल्या संकटकाळात भारतीय तटरक्षक दलाने (ICG) अत्यंत साहसी कामगिरी केली आहे. तटरक्षक दलाने खवळलेल्या समुद्रात धाडसी मोहीम राबवत, संकटात सापडलेल्या एमव्ही सिग्मा पर्ल (MV Sigma Pearl) या मालवाहू जहाजावरील सर्व २० खलाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. या उच्च-जोखीम मोहिमेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

इंजिन फेल झाल्यामुळे जहाज पडले अडकून

मार्शल द्वीपध्वजाखाली चालणारी आणि सिंगापूरकडे जाणारी 'सिग्मा पर्ल' ही बल्क कॅरियर जहाजावरील माल खाली करून विशाखापट्टणम बंदरातून परतत असताना आंध्र प्रदेशमधील अंतर्वेदीजवळ समुद्रात अडकली. 'अर्नब' चक्रीवादळाच्या तडाख्यात आल्यामुळे या जहाजाचे इंजिन फेल झाले होते. अस्मानी संकटामुळे जहाजावरील खलाशांचे प्राण धोक्यात आले होते.

तटरक्षक दलाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि २४ तासांच्या आत हे बचावकार्य पूर्ण केले. तटरक्षक दलाच्या 'सुजय' या जहाजाने आणि हेलिकॉप्टरने (ICG Helo) केलेल्या या साहसी मोहिमेत पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मोगलतूर येथील हेलिपॅडची मदत घेण्यात आली. तीव्र वाऱ्याचा वेग आणि खवळलेला समुद्र असूनही तटरक्षक दलाच्या जवानांनी सर्व २० खलाशांना सुरक्षितपणे एअरलिफ्ट केले. याआधी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तटरक्षक दलाने घेतलेल्या अग्रीम घेरामुळे समुद्रात मोठी जीवितहानी टळली आहे.