नवी दिल्ली
आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये 'अर्नब' (Cyclone Arnab) चक्रीवादळाने मोठे नुकसान केले असून, आंध्र प्रदेशमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३१ घरे डॅमेज झाली आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली.
एनडीआरएफचे महानिरीक्षक (IG) नरेंद्र सिंग बुंदेला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्र तसेच आंध्र प्रदेश आणि ओडिसाची आपत्ती व्यवस्थापन पथके पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. हे चक्रीवादळ पुद्दुचेरीच्या यानमजवळ धडकले असून, अत्यंत तीव्र चक्रीवादळावरून आता ते एका तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात कमजोर झाले आहे. संध्याकाळपर्यंत ते आणखी कमी होत डीप डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याचा अंदाज आहे.
ओडिशाच्या दक्षिण भागात आणि आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील भागात या वादळाचा सर्वाधिक प्रभाव पडला असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये झाडे उन्मळून पडली असून ३ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. ओडिसावर मात्र प्राथमिक अहवालानुसार फारसा गंभीर प्रभाव पडलेला नाही.
या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आंध्र प्रदेश, ओडिसासह छत्तीसगड, झारखंड, पुद्दुचेरी, तेलंगणा आणि अंदमान-निकोबार बेटांवर एकूण ३९ एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. आंध्र प्रदेशात ५७,००० हून अधिक लोकांना तर यानमधून ३८ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.