'रामायण पार्ट १' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ; जगभरात अडव्हान्स बुकिंग २४ कोटींच्या पार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
'रामायण पार्ट १' चित्रपटातील एक दृश्य
'रामायण पार्ट १' चित्रपटातील एक दृश्य

 

मुंबई  

दिवाळी अवघी काही दिवसांवर आली असताना, दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण पार्ट १' (Ramayana Part 1) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली आहे. रिलीज होण्यासाठी अजून सहा दिवस बाकी असतानाच या चित्रपटाने अडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधी रुपयांची कमाई केली असून, जगभरात चित्रपटाचे प्री-सेल्स २४ कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

भारतात अडव्हान्स बुकिंगची घोडदौड

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रणबीर कपूर मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवसाच्या अडव्हान्स बुकिंगमध्ये ब्लॉक सीटसह १७.१३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ब्लॉक सीटशिवाय चित्रपटाचे प्री-रिलीज कलेक्शन १४.२८ कोटी रुपये इतके असून, देशभरातील ६,७८० शोसाठी ३.३४ लाख तिकीट विकले गेले आहेत.

या अडव्हान्स बुकिंगमध्ये हिंदी व्हर्जन आघाडीवर असून त्याने जवळपास ८३ टक्के म्हणजेच १४.२१ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. याशिवाय कन्नड व्हर्जनमधून २.३७ कोटी, तेलुगू भाषेतून ४९.७७ लाख आणि तमिळ भाषेतून ५.५८ लाखांची कमाई झाली आहे. राज्यांचा विचार केला तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्ली ही राज्ये अडव्हान्स बुकिंगमध्ये आघाडीवर आहेत.

जागतिक स्तरावर जोरदार प्रतिसाद

लॉस एंजेलिस येथील जागतिक प्रिमियरनंतर 'रामायण पार्ट १' च्या उत्तर अमेरिकेतील अडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. अहवालानुसार, चित्रपटाच्या प्रीमिअर सेलने १.९१ मिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. जगभरात पहिल्या दिवसाचे अडव्हान्स बुकिंग २५ लाख डॉलर (२४ कोटी रुपये) च्या पुढे गेले असून, यात उत्तर अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी जगभरात चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे.