रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये होणार प्रीमिअर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'रामायण' हा चित्रपट आता जागतिक मंचावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या महाकाव्याचा भव्य जागतिक प्रीमिअर (World Premiere) मंगळवारी लॉस एंजेलिस येथील ॲकॅडमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्सच्या प्रतिष्ठित डेव्हिड गेफेन थिएटरमध्ये पार पडणार आहे. हॉनीवूडमधील नामाक्त चित्रपटसृष्टीचे दिग्गज, आंतरराष्ट्रीय पत्रकार आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी या ३डी स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत.

चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सुवर्णक्षण आहे. अमेरिकेतील एका संपूर्ण शहरात 'रामायण'चे होर्डिंग्ज लागणे आणि मुख्य प्रवाहातील पाश्चात्य प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असणे, ही भारतीय सिनेमासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. प्राइम फोकस स्टुडिओ, DNEG आणि यशच्या मॉन्स्टर माईंड क्रिएशन्सच्या सहकार्याने बनलेला हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात भव्य निर्मिती मानला जात आहे.

दोन भागांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'रामायण'
दोन भागांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या भव्य सिनेमात रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी सीता, तर यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय सनी देओल, अरुण गोविल, लारा दत्ता आणि अनुपम खेर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

चित्रपटाचा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये IMAX फॉरमॅटमध्ये रिलीज केला जाणार आहे. भारताबाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाचे वितरण सोनी पिक्चर्स करणार आहे.


Latest News