पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिश्रण (Ethanol Blending) वाढवण्याचा केंद्र सरकारचा सध्या कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिले आहे. दक्षिण गोव्यातील बेटुल गावात आयोजित २९ व्या 'एनर्जी तंत्रज्ञान आणि नवसंशोधन परिषदेच्या' उद्घाटनादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) इंधनाबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.
इथेनॉल मिश्रणाबाबत पसरवली जाणारी माहिती हा एक बनावट आणि रचलेला अजेंडा असल्याचे सांगत हरदीप सिंह पुरी म्हणाले, "जैविंधनाच्या संदर्भात सांगायचे तर, २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे आमचे लक्ष्य होते आणि सध्या ते २० टक्क्यांहून अधिक वाढवण्याची आमची कोणतीही इच्छा नाही." कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि चालू खात्यातील तूट नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने ई-२० इंधन बाजारात आणले आहे.
१.६ लाख कोटींची बचत आणि शेतकऱ्यांना दिलासा
ई-२० पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब होत असल्याच्या दाव्यांचा समाचार घेताना मंत्री म्हणाले की, देशात दररोज सुमारे ६ कोटी वाहने पेट्रोल पंपांवर जातात. जर खरोखरच इंजिन खराब झाले असते, तर रस्त्यांवर वाहने बंद पडलेली दिसली असती. २००३ पूर्वी तयार झालेल्या जुन्या वाहनांमध्ये काही किरकोळ अडचणी असू शकतात, परंतु नवीन वाहने ई-२० इंधनासाठीच डिझाइन केलेली आहेत.
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केल्यामुळे केंद्र सरकारचे १ लाख ६० हजार कोटी रुपये वाचले आहेत. यातील १ लाख ४० हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. यामुळे आमचा शेतकरी 'अन्नदाता'सोबतच 'ऊर्जादाता' बनला आहे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, रस्ते वाहतूक मंत्रालयाने सेंट्रल मोटर व्हेईकल रूल्स १९८९ मध्ये सुधारणा अधिसूचित केल्या असून, आता १०० टक्क्यांपर्यंत इथेनॉलवर चालणाऱ्या 'फ्लेक्स-फ्युएल' वाहनांना मंजुरी दिली आहे. टोयोटा, टाटा मोटर्स आणि ह्युंदाई यांसारख्या प्रमुख कंपन्या भारतीय बाजारासाठी फ्लेक्स-फ्युएल वाहने विकसित करत आहेत.