प्रभासच्या 'फौजी' चित्रपटावरून नवा वाद; इतिहास मोडतोड केल्याचा नेताजींच्या नातवाची आरोप

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या आगामी 'फौजी' (Fauzi) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी या चित्रपटाच्या टीझरवर तीव्र आक्षेप नोंदवला असून, यामध्ये ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप केला आहे. निर्मात्यांनी हा टीझर तात्काळ मागे घेऊन त्यात सुधारणा करून नवा टीझर जारी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये चंद्रकुमार बोस यांनी "इतिहास आणि काल्पनिक गोष्टींची सरमिसळ करणे हा एक गुन्हा आहे," असे स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. दिग्दर्शक हनू राघवपुडी आणि निर्मिती संस्थेने ऐतिहासिक घटना व व्यक्तिमत्त्वांचे चुकीचे सादरीकरण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

टीझरमधील 'त्या' प्रसंगावरून वाद
२३ ऑक्टोबर रोजी अभिनेता प्रभासच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरमध्ये १९४२ मधील बर्लिनमधील एक प्रसंग दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि जर्मन हुकूमशहा अडॉल्फ हिटलर यांच्यात काल्पनिक संवाद दाखवला आहे. या प्रसंगात नेताजी एका भारतीय गुप्तहेराचे वर्णन करताना दिसतात आणि भगवद्गीतेवर आधारित गुप्त कोडचा उल्लेख करतात. यानंतर प्रभासच्या काल्पनिक सैनिकाच्या पात्राची एंट्री दाखवली जाते.

एका वास्तविक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाने काल्पनिक पात्राचे समर्थन करणे हे चुकीचे असल्याचे सांगत चंद्रकुमार बोस यांनी आक्षेप घेतला आहे. या टीझरमुळे सोशल मीडियावर इतिहास विरुद्ध कलात्मक स्वातंत्र्य अशी मोठी चर्चा रंगली आहे. हनू राघवपुडी दिग्दर्शित आणि मैत्री मूव्ही मेकर्स निर्मित 'फौजी' हा चित्रपट १९ मार्च २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.


Latest News