सोशल मीडियावरील खोट्या प्रचाराविरोधात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना आक्रमक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना

 

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेते विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्याविषयी सोशल मीडियावर पसरवले जाणारे खोटे दावे आणि बनावट मजकुराविरोधात कठोर पावले उचलण्यात आली आहेत. अभिनेत्यांच्या प्रतिनिधीने सोमवारी हैदराबाद येथील सायबर क्राईम पोलिसांकडे या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

खोट्या अफवा आणि सायबर छळाविरोधात तक्रार
'कॉफी विथ करण ९' या लोकप्रिय शोमध्ये हजेरी लावत या जोडीने सहभाग नोंदवल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल विविध खोट्या चर्चा आणि मजकूर पसरवला जात होता. या तक्रारीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील विशिष्ट डिजिटल सामग्री, बनावट स्क्रीनशॉट, खोटे दावे आणि लक्ष्य करून केला जाणारा ऑनलाइन त्रास यांचा समावेश असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदारांच्या टीमने या सर्व प्रकरणाचे पुरावे आणि संबंधित लिंक्स पोलिसांच्या तपासासाठी सादर केल्या आहेत. जाणीवपूर्वक तयार केलेला दिशाभूल करणारा प्रचार आणि पेड कॅम्पेन्सविरोधात कायद्यानुसार योग्य ती कारवाई होईल, अशी अपेक्षा टीमने व्यक्त केली आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया
दरम्यान, सायबरबाद पोलिसांनी सांगितले की, सेरिलिंगमपल्ली झोनच्या अतिरिक्त डीसीपींकडे या ऑनलाइन प्रकाशनांवरील तक्रार प्राप्त झाली असून पोलीस सध्या तिचे परीक्षण करत आहेत. अर्जातील मजकूर दखलपात्र स्वरूपाचा नसल्यामुळे या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.