सुधीर फडकेंच्या लग्नात मोहम्मद रफींनी गायल्या होत्या मंगलाष्टका

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी आणि संगीतकार सुधीर फडके आणि त्यांच्या पत्नी ललिता देउळकर
सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी आणि संगीतकार सुधीर फडके आणि त्यांच्या पत्नी ललिता देउळकर

 

भक्ती चाळक

रुपेरी पडद्यावरील कलाकारांच्या आयुष्यात अनेक अलौकिक प्रसंग दडलेले असतात. अशाच प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील काही हळव्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही सुरू करत आहोत एक खास मालिका 'एक कहाणी'. चला तर मग, जाणून घेऊया दोन संगीतोपासकांच्या मैत्रिणीचा हा सुरेल अध्याय...

‘एक धागा सुखाचा…’, ‘आमचा राजू का रुसला…’ अन् ‘खेड्यामधले घर कौलारू…’ अशा एकापेक्षा एक कालजयी गाण्यांनी मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुधीर फडके ऊर्फ बाबुजी! दुसरीकडे आपल्या लयबद्ध आवाजाने अख्ख्या जगाला वेड लावणारे शहंशाह-ए-मौसिकी मोहम्मद रफी!

या दोन गानतपस्वींमध्ये एक अतूट नातं होतं. पण बाबुजींच्या लग्नात खुद्द मोहम्मद रफी यांनी मराठमोळ्या पद्धतीने थेट मंगलाष्टके गायली होती, हा किस्सा तुम्हाला ठाऊक आहे का? इसाक मुजावर यांच्या ‘राफीनामा’ या जुन्या पुस्तकातून या दोन कलाकारांमधील निखळ मैत्रीची साक्ष देण्यात आली आहे.
 

१९३८ चा तो काळ अन् ललिता देउळकर यांचा दबदबा
या कहाणीचे खरे मूळ दडले आहे १९४० च्या दशकातील चित्रपटसृष्टीत. बाबुजींच्या पत्नी ललिता देउळकर या स्वतः एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि गायिका होत्या. १९३८ मध्ये ‘वचन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. अल्पावधीतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

१९४७ मध्ये प्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘साजन’ या चित्रपटाचे काम सुरू होते. या चित्रपटात ललिता देउळकर आणि मोहम्मद रफी यांना एकत्र गाणे गायले.

'त्या' एका शब्दाने मिळाला आत्मविश्वास
त्या काळात मोहम्मद रफी हे चित्रपटसृष्टीत अगदी नवखे होते. नवशिक्या गायक म्हणून ते आपले स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होते. याउलट ललिता देउळकर या प्रस्थापित आणि लोकप्रिय गायिका होत्या.

रॅकॉर्ड रूममध्ये दिग्गज गायिकेसोबत गाताना रफी साहेबांवर प्रचंड दडपण आले. गाणे गाताना ते वारंवार अडखळत होते, त्यांचा सूर चुकत होता. रफी साहेबांचा तो चेहरा आणि मनातली धाकधूक ललिताजींनी क्षणात ओळखली.

त्यांनी तात्काळ मध्यस्थी केली. रफी साहेबांना धीर दिला. “घाबरू नका, तुम्ही खूप छान गाताय…” असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण केला. ललिताजींच्या या पाठिंब्यामुळे रफी साहेबांचा ताण हलका झाला आणि त्यांनी ते गाणे अत्यंत अप्रतिम पद्धतीने पूर्ण केले. हे गाणे पुढे जाऊन तुफान गाजले.

मैत्रीखातर गायली मराठमोळी मंगलाष्टके!
त्या एका प्रसंगाने मोहम्मद रफी यांच्या मनात ललिता देउळकर यांच्याबद्दल अथांग आदराची आणि मैत्रीची भावना निर्माण झाली.

त्यानंतर फेब्रुवारी १९४९ मध्ये सुधीर फडके आणि ललिता देउळकर यांचा विवाहसोहळा पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने पार पडला. या लग्नाला अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. पण ललिताजींनी सुरुवातीच्या काळात दिलेल्या त्या सहकार्याची आठवण आणि निखळ मैत्रीखातर मोहम्मद रफी आवर्जून लग्नाला पोहोचले.

केवळ उपस्थित न राहता, रफी साहेबांनी त्या मराठमोळ्या लग्नसोहळ्यात स्वतः सुरावलीत मंगलाष्टके गायली!. एका मुस्लिम गायकाने मराठमोळ्या लग्नात उभं राहून मंगलाष्टके गाणे, हा क्षण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी आश्चर्यकारक ठरला.

अजरामर झालेली कहाणी
रफी साहेब आणि बाबुजींचे हे मैत्रिपूर्ण नाते पुढे आयुष्यभर कायम राहिले. माणूस म्हणून एकमेकांना सावरून घेणे आणि धर्माच्या पलीकडे जाऊन जपलेले मैत्रीचे या ‘एक कहाणी’ची खरी ताकद आहे. सुधीर फडके, ललिता देउळकर आणि मोहम्मद रफी यांच्यातील हा दुर्मिळ प्रसंग आजही संगीतप्रेमींच्या मनाला तितकाच भावूक करणारा आहे!

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter