बेइजिंंग/ल्हासा
चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या ७.० तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून ७६ जण जखमी झाले आहेत. तसेच प्रशासनाने तातडीची पावले उचलत १२ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तपत्रांनुसार, बाकेन काउंटी (नाग्चू शहर) येथे जमिनीपासून १० किलोमीटरपेक्षा कमी खोलीवर हा भूकंपाचा धक्का बसला. या भीषण भूकंपामुळे ३३० हून अधिक घरे कोसळली किंवा त्यांचे नुकसान झाले आहे. घटनेची गंभीर दखल घेत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्याचे आणि जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.
भूकंपग्रस्त भागात प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. चीन सरकारने आपत्कालीन आपत्ती निवारणासाठी ५० दशलक्ष युआन (अंदाजे ७.५ दशलक्ष डॉलर्स) निधी जाहीर केला आहे, तर पुनर्प्राप्ती प्रयत्नांसाठी अतिरिक्त ३० दशलक्ष युआन राखीव ठेवले आहेत. बाधित भागात १००० हून अधिक प्रीफेब्रिकेटेड घरे, ३२३९ तंबू, २८२१ फोल्डिंग बेड आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.
प्रभावित क्षेत्राची सरासरी उंची ४८०० मीटरपेक्षा जास्त असून पुढील तीन दिवसांत तापमान उणे ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तीव्र थंडी आणि बर्फवृष्टीच्या शक्यतेमुळे मदतकार्यासमोर आव्हानांचा सामना करावा लागत असला, तरी बाधित कुटुंबांना निवारा आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.