मुंबई
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केल्याप्रकरणी राजस्थानमधील कोटा येथून पकडलेल्या तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना कोटा येथून मुंबईत आणताना पोलिसांनी अत्यंत गुप्त आणि सुरक्षित पद्धतीने प्रवास करत तीन वेळा मार्ग बदलल्याची माहिती समोर आली आहे.
हृतिक कुमार ऊर्फ रोशन, रेहान आणि फूल सिंह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी मुंबईच्या जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर हे आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून त्यांना सोमवारी सकाळी कोटा रेल्वे स्थानकावर जेरबंद करण्यात आले.
कोटा पोलिसांकडून ताबा घेतल्यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने या तिन्ही आरोपींना घेऊन १६ तासांचा प्रवास केला. राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांमधून जाताना सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांच्या ताफ्याने आपल्या गाड्या आणि मार्ग वारंवार बदलले. प्रवासादरम्यान आरोपींना वेगवेगळ्या वाहनांमध्ये बदलण्यात आले असून, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वाटेतच त्यांची कसून चौकशी केली.
लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, आरोपी नेपाळला पळून जाण्यासाठी सुरत मार्गे जयपूरची ट्रेन पकडणार होते. जुहू येथे खेळून परतत असताना टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञातांनी ७ राऊंड फायरििंग केले होते. सुदैवाने या हल्ल्यात अभिनेता सुखरूप बचावला असला, तरी त्याचे चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाले होते.