नागोया
जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या तिरंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. पुरुषांच्या पॅरा रिकर्ब दुहेरी प्रकारात हरविंदर सिंग आणि विजय सुंडी या जोडीने अंतिम फेरीत चीनचा ५-१ ने पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
ओकाझाकी च्युओ सोगो पार्क मल्टिपर्पज स्क्वेअर येथे झालेल्या या अंतिम सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही संघांनी ३५-३५ अशी बरोबर गुणसंख्या नोंदवली. यानंतर भारतीय जोडीने आक्रमक खेळ करत दुसरा सेट ३७-३६ आणि तिसरा सेट ३८-३६ असा जिंकत ५-१ ने सामना आपल्या खिशात घातला. चीनच्या युन डुओ आणि झाओ लिक्सुए या जोडीला भारतीय खेळाडूंच्या अचूक टार्गेटसमोर पराभव स्वीकारावा लागला.
दुसरीकडे, महिलांच्या पॅरा रिकर्ब दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या भावना चौधरी आणि पूजा जाटियान यांना चीनच्या गाओ जिहान आणि वांग सुएक्ियान यांच्याविरुद्ध ०-६ असा पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला जोडीने तिन्ही सेटमध्ये संघर्ष केला, मात्र चीनच्या खेळाडूंनी बाजी मारल्यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले