दिवाळीच्या तोंडावर काश्मिरी सफरचंदाचा तुटवडा; फंगसच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठे नुकसान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

श्रीनगर 

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये काश्मिरी सफरचंदांना मोठी मागणी आहे. मात्र, यंदा सफरचंदाच्या पिकावर 'स्कॅब' या बुरशीजन्य आजाराचा (Fungal Outbreak) मोठा प्रादुर्भाव झाल्यामुळे बाजारपेठेत पुरेशा प्रमाणात चांगल्या दर्जाच्या सफरचंदांचा पुरवठा होत नसल्याची माहिती उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी दिली आहे.

बुरशीजन्य रोगामुळे गुणवत्तेवर मोठा परिणाम

काश्मीर फ्रूट ग्रोअर्स अँड डीलर्स असोसिएशनचे सरचिटणीस जहूर अहद तांत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी लागणाऱ्या 'अ' दर्जाच्या मोठ्या सफरचंदांना आणि गिफ्ट पॅक्सना बाजारात उत्तम मागणी आहे. मात्र, प्राथमिक आणि दुय्यम 'स्कॅब'चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरल्याने सफरचंदांची गुणवत्ता प्रचंड घसरली आहे.

मंडईत येणाऱ्या एकूण सफरचंदांपैकी तब्बल ५० ते ६० टक्के फळे ही 'ब' आणि 'क' दर्जाची आहेत, ज्यांना सध्याच्या बाजारात अतिशय कमी दर मिळत आहे. उत्पादनाचा खर्च 'अ', 'ब' किंवा 'क' अशा तिन्ही दर्जासाठी सारखाच लागत असला, तरी केवळ चांगल्या दर्जाच्या फळांनाच योग्य भाव मिळतो. त्यामुळे उत्पादक, व्यापारी आणि खरेदीदार सर्वच जण चिंतेत सापडले आहेत.

दरांबाबत व्यापाऱ्यांचे मत आणि आवक

दुसरीकडे, बिहार येथील व्यापारी मोहम्मद सुहेल तन्वीर यांनी सांगितले की, सध्या बाजारातील सफरचंदाचे दर रास्त आहेत. लाकडी पेटी सुमारे १,३०० रुपये तर पुठ्ठ्याचा बॉक्स ६०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. सणामुळे दर चांगले असून या मंडईतून दररोज ४०० ते ५०० ट्रक सफरचंद विविध राज्यांत पाठवले जात आहेत.