कर्जवसुलीसाठी छळ केल्यास बँक आणि मायक्रोफाय फाइनेंस कंपन्यांवर सदोष वधाचा गुन्हा: एकनाथ शिंदे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 h ago
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

 

नांदेड

महाराष्ट्रात तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत कडक इशारा दिला आहे. कर्जबाजारीपणा आणि वसुलीच्या त्रासाला कंटाळून जर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, तर संबंधित बँक, मायक्रोफायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांवर हत्येचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी कठोर घोषणा त्यांनी नांदेड येथे केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील वाडी बुद्रुक येथे १०० खाटांच्या उप-जिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना खचून न जाण्याचे आवाहन करत सरकार पूर्णपणे पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.

छळवणूक सहन केली जाणार नाही

नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने कर्ज वसुलीच्या त्रासातून वित्त कंपनीच्या कार्यालयातच आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मायक्रोफायनान्स कंपन्या, बँका आणि सावकारांनी संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा छळ करू नये. जर अशा त्रासामुळे शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले, तर दोषींवर थेट हत्येचा गुन्हा नोंदवला जाईल.

तसेच, राज्य सरकारने दिवाळीपूर्वी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कन्येच्या विवाहाची जबाबदारी त्यांची शिवसेना पार पाडेल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. राज्यातील ३५८ पैकी ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, सरकार प्रत्येक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.