नवी दिल्ली
बेंगलुरु आणि मुंबई दरम्यान सुरू होणारी नवीन वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेन दोन्ही महानगरांमधील कनेक्टिव्हिटीसाठी एक 'गेम चेंजर' ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ही नवी रेल्वे सेवा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी वरदान ठरणार असून, विशेषतः तरुण, आयटी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत या नव्या रेल्वेसेवेचे स्वागत केले. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांचे शहर असलेल्या बेंगलुरुमधून आणखी एक उत्तम रेल्वे कनेक्टिव्हिटीचे पाऊल उचलण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी बेंगलुरु आणि मुंबईला जोडणाऱ्या या नव्या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले, ज्यामुळे दोन्ही प्रमुख शहरांमधील रात्रीचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायक होणार आहे.