समीर शेख
मुस्लिम तरुणांनी आपले चारित्र्य (अखलाख) सुधारण्यासाठी आणि जीवनात योग्य मार्ग निवडण्यासाठी इतर कुठेही जाण्याची गरज नाही. इस्लाम हाच यासाठी सर्वात उत्तम मार्ग आहे, असे प्रतिपादन हाफिज मौलाना तौफीक अश्रफी यांनी केले आहे. 'आवाज द व्हॉईस'शी विशेष संवाद साधताना त्यांनी मुस्लिम तरुणांना उत्तम चारित्र्य, हलाल-हराममधील फरक आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
उत्तम चारित्र्यासाठी इस्लाम हाच सर्वोत्तम मार्ग
कुराणमध्ये अल्लाहने प्रेषित मोहम्मद (स.) यांच्याविषयी म्हटले आहे की, "इन्नका लअला खुलुकिन अज़ीम" म्हणजेच तुम्ही चारित्र्याच्या सर्वात सर्वोच्च शिखरावर आहात.
'आवाज द व्हॉईस'शी बोलताना मौलाना अश्रफी म्हणाले, "सच्चा मोमिन तोच आहे, ज्याच्या जिभेने आणि हाताने दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्रास पोहोचत नाही. जर एखाद्या मुस्लिम तरुणाने आपल्या रोजच्या जीवनात केवळ या एकाच गोष्टीवर अंमलबजावणी केली की त्याच्याकडून कोणालाही त्रास होणार नाही, तर त्याच्यात सर्व चांगले गुण आपोआप निर्माण होतील. समाजासाठी एक उत्तम आणि फायदेशीर माणूस बनण्याचा हा सर्वात सोपा आणि सरळ रस्ता आहे."
हलाल आणि हराम कमाईमधील फरक
आजच्या काळात एका मुस्लिम तरुणाने हलाल आणि हराम यामधील फरकाची विशेष काळजी घेतली पाहिजे. समाजातील एक चांगला माणूस बनण्यासाठी केवळ हलाल आणि कायदेशीर गोष्टींकडेच कल असणे गरजेचे आहे.
इस्लामने हराम अन्न, दारू आणि नशेच्या गोष्टींना सक्त मनाई केली आहे. याचबरोबर हलाल कमाईचा अर्थ असा आहे की, व्यापार किंवा नोकरीमध्ये कोणताही धोका किंवा फसवणूक असू नये. एखाद्याला फसवून किंवा खोटे बोलून पैसे कमावणे इस्लाममध्ये हराम आहे.
मौलाना यांनी स्पष्ट केले, "जर कोणी व्यवसायात देवाणघेवाण करताना खोटे बोलून सौदा करत असेल, तर तो व्यवसाय कायदेशीर असला तरी त्या खोटेपणामुळे ती कमाई हराम ठरते. दुर्दैवाने आजचे तरुण ही बारकावी नीट समजू शकत नाहीत आणि भरकटतात." तरुणांनी हलाल आणि हराम समजून योग्य मार्गावर चालल्यास संपूर्ण समाजाचे भले होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इंटरनेटवरून इस्लाम शिकणे टाळा
मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात तरुणांना सतर्क राहण्याचा सल्ला देताना मौलाना अश्रफी यांनी एका मोठ्या समस्येकडे लक्ष वेधले. 'आवाज द व्हॉईस'ला सविस्तर माहिती देताना ते म्हणाले, "आजकाल तरुण इस्लाम समजून घेण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. तिथे कोणीही कुराणातील एखादी आयत वाचून त्याचा चुकीचा अर्थ सांगतो आणि तरुणांची दिशाभूल करतो. इंटरनेटवर अनेकदा आयतीचा केवळ अनुवाद (तर्जुमा) सांगितला जातो, पण तिचा संदर्भ सांगितला जात नाही की ती आयत कोणत्या परिस्थितीत अवतरली होती. संदर्भ माहीत नसल्याने गैरसमज निर्माण होतात."
त्यामुळे मोबाईलवरून इस्लाम शिकण्याऐवजी मशिदींकडे वळावे आणि आपल्या आजूबाजूच्या जाणकार आलिम (विद्वानांकडून) लोकांकडून धर्म समजून घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. अल्लाहकडे लक्ष वळवल्याने मन वाईट गोष्टींपासून दूर राहते आणि मशिदींमध्ये जाऊन इमामांची भेट घेतल्यानेच इस्लाम योग्य प्रकारे समजेल, असे ते म्हणाले.
इंटरनेटवरील प्रलोभने आणि देशाची सुरक्षा
मोबाईलच्या माध्यमातून जगभरातून फसवणूक होण्याचा मोठा धोका असल्याचेही मौलाना यांनी अधोरेखित केले. इंटरनेटवर तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात, ती कोणत्या देशाची किंवा संघटनेची आहे आणि तिची विचारसरणी काय आहे, हे कोणालाच माहीत नसते.
याविषयी अत्यंत गंभीर इशारा देताना ते म्हणाले, "आजकाल इंटरनेटद्वारे तरुणांकडून एखाद्या विशिष्ट परिसराचे फोटो किंवा व्हिडिओ मागितले जातात आणि बदल्यात पैशांचे आमिष दिले जाते. अशा फुकटच्या पैशांची लालच करणे इस्लाममध्ये अजिबात जायज नाही. तुम्ही पाठवलेल्या माहितीचा वापर एखादा अनोळखी माणूस आपल्या देशाच्या (मुल्क) विरोधात चुकीच्या कामासाठी करू शकतो."
कोणतीही व्यक्ती फुकट पैसे देत नाही हे तरुणांनी वेळीच ओळखले पाहिजे. "तुमच्या एका चुकीचा फटका तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला बसू शकतो. त्यामुळे मोबाईलचा वापर अत्यंत विचारपूर्वक करा," असे आवाहन मौलाना तौफीक अश्रफी यांनी शेवटी केले.
(लेखक हे आवाझ-द-व्हॉईस मराठीचे संपादक आहेत.)