नवी दिल्ली
दिल्लीतील मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर खलिस्तान समर्थक घोषणा लिहून विद्रूपीकरण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. बंदी घातलेल्या 'सिख्स फॉर जस्टिस' (SFJ) या संघटनेच्या सांगण्यावरून आणि मोठ्या आर्थिक आमिषाला बळी पडत आरोपींनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
२९ ऑक्टोबर रोजी जहांगीरपुरी मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक १ जवळ खलिस्तान समर्थक आणि चिथावणीखोर मजकूर आढळून आला होता. त्यानंतरच्या दिवशी शास्त्री नगर मेट्रो स्थानकाच्या पायऱ्यांच्या भिंतीवरही अशाच प्रकारचा मजकूर आढळला होता. या प्रकारानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तातडीने तपासाची चक्रे फिरवत हरियाणामधील पानिपत येथील रहिवासी सुमीत उर्फ रफ्तार, पंजाबमधील सुमीत कुमार उर्फ काका आणि गुरप्रीत या तिघांना ताब्यात घेतले.
विशेष पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) नर्रा चैतन्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सुमीत कुमार हा लुधियाना आणि गुरुदासपूर भागातील एसएफजेच्या सहानुभूतीदारांच्या संपर्कात होता. गुप्त संदेश वहन प्रणालीचा (Encrypted Messaging App) वापर करून त्याला दिल्लीतील प्रमुख मेट्रो स्थानकांवर अशा घोषणा लिहिण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. यासाठी त्यांना मोठी रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून आपल्या हँडलर्सना पाठवला होता. सध्या पोलीस या नेटवर्कमधील इतर सहभागी व्यक्तींचा आणि मुख्य सुत्रधारांचा शोध घेत आहेत.