अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांचे नशीब पणाला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेच्या राजकीय भवितव्याचा निर्णय घेणाऱ्या आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मध्यवधी निवडणुकीसाठी (Midterm Elections) मंगळवारी मतदान होणार आहे. इराणमधील प्रदीर्घ युद्ध, वाढती महागाई, जागतिक व्यापार युद्ध आणि सामाजिक मतभेद या पार्श्वभूमीवर होत असलेली ही निवडणूक ट्रम्प यांच्या अध्यक्षतेवरील जनमत चाचणी (Referendum) मानली जात आहे.

या निवडणुकीद्वारे ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष अमेरिकन काँग्रेसच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज (प्रतिनिधी गृह) आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवरील आपले नियंत्रण कायम राखणार की डेमोक्रॅटिक पक्ष किमान एका सभागृहात सत्ता हस्तगत करणार, याचा फैसला होणार आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जच्या सर्व ४३५ जागा आणि १०० सदस्यांच्या सिनेटमधील ३७ जागांसाठी हे मतदान होत आहे. याशिवाय ३६ राज्यांमध्ये गव्हर्नर पदासाठीही निवडणूक होत आहे.

भारतीय वंशाच्या उमेदवारांचे नशीब पणाला
या निवडणुकीत अनेक भारतीय वंशाचे अमेरिकन उमेदवार रिंगणात आहेत. ओहायोमध्ये गव्हर्नर पदासाठी भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या ॲमी ॲक्टन यांच्यात थेट लढत आहे. लॉस एंजेलिसच्या महापौरपदासाठी केरळमध्ये जन्मलेल्या डेमोक्रॅट नित्या रमण शर्यतीत आहेत. प्रतिनिधी गृहात रो खन्ना, अमी बेरा, प्रमिला जयपाल आणि सुहास सुब्रमण्यम पुन्हा निवडून येण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर पिया दांडिया आणि अमिश शाह पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.

प्रेडिक्शन पोलनुसार, डेमोक्रॅट्सनी संसदेवर ताबा मिळवल्यास ट्रम्प यांच्या निर्णयांवर कायदेशीर चाप बसेल. ट्रम्प यांनीही असे घडल्यास आपण व्हीटो (Veto) अधिकाराचा वापर करून निर्णय लागू करू, असे संकेत दिले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डेमोक्रॅट्सचा प्रचार सांभाळला आहे. अमेरिकेत सुमारे २१ कोटी नोंदणीकृत मतदार असून, सोमवारपर्यंत तब्बल ५.७ कोटी मतदारांनी अगोदरच (Early Voting) मतदान केले आहे.