नेपाळमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या ६ भारतीयांची यशस्वी सुटका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नेपाळमधील शेय-फोक्सुंडो राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या सहा भारतीय पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून बर्फवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या या पर्यटकांना एका खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले, अशी माहिती डोल्पा जिल्हा पोलीस कार्यालयाचे प्रवक्ते आणि पोलीस निरीक्षक बिनय सिंग यांनी दिली.

या सर्व पर्यटकांमध्ये दोन महिला आणि चार पुरुष समाविष्ट असून त्यांच्यावर डोल्पा जिल्ह्यातील दुने येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व पर्यटकांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हे पर्यटक काठमांडूपासून ३०० किमी वायव्येला असलेल्या शेय-फोक्सुंडो ग्रामीण नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ८ मधील धो भागात गेले होते, जिथे मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली होती.

हवामानाचा इशारा डावलून प्रवास 
स्थानिक प्रशासनाने तीव्र बर्फवृष्टीचा इशारा दिला असताना आणि प्रवास न करण्याचा सल्ला दिला असतानाही हे पर्यटक शेय-फोक्सुंडो भागात गेले होते. शेय-फोक्सुंडो सरोवर हे नेपाळमधील सर्वात खोल सरोवर असून ते ३,६०० मीटर उंचीवर स्थित आहे. शनिवारी या परिसरात तुफान बर्फवृष्टी झाल्यामुळे शेय-फोक्सुंडो सरोवरावरून परतताना नुमला आणि वाग्ला घाटात हे पर्यटक अडकले.

रविवारी सैन्याच्या हेलिकॉप्टरने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अत्यंत खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे लँडिंग होऊ शकले नाही. अखेर सोमवारी सकाळी खासगी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. डोल्पा जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, या भारतीय पर्यटकांनी आवश्यक ती प्रशासकीय परवानगी न घेताच अप्पर डोल्पा भागात प्रवास केला होता.