भक्ती चाळक
रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या कलाकारांचे यश, ग्लॅमर आणि त्यांचा थाटमाट आपल्याला दिसतो. पण या झगमगाटामागे दडलेला असतो एक संघर्ष, न सांगिलेल्या वेदना आणि काळजाला तडे पाडणाऱ्या आठवणी.
प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील याच अनवट, हळव्या आणि प्रेरणादायी प्रसंगांना उजाळा देण्यासाठी आम्ही सुरू केलीय एक खास मालिका ‘एक कहाणी’. चला तर मग, जाणून घेऊया या मालिकेतील आजची ही हृदयस्पर्शी कथा...
“कचऱ्याच्या ढिगाऱ्याचीसुद्धा जागा बदलते, तू तर माणूस आहेस! तुझी वेळ पण नक्की येईल…”
आईच्या तोंडून आलेले हे अंतःकरणाला भिडणारे शब्द! हे शब्द निराश झालेल्या नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा संजीवनी मंत्र ठरले.
नवाझ यांना संपूर्ण जगाने नाकारले, दिसण्यावरून हिणवले, आवाजाची खिल्ली उडवली, तेव्हा आईच्या एका वाक्याने त्यांना पुन्हा उभे राहण्यास बळ दिले. आजच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेता म्हणून ते ओळखले जातात.
मुंबईत पाऊल अन् वॉचमनची नोकरी
उत्तर प्रदेशातील एका अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेल्या नवाझुद्दीन यांचे स्वप्न अभिनेते बनण्याचे होते. खिशात मोजके पैसे घेऊन ते स्वप्नांच्या मुंबई नगरीत आले.
सुरुवातीच्या दिवसांत पोट भरण्यासाठी त्यांनी वॉचमनची नोकरी केली. रात्रीची नोकरी करायची आणि दिवसा नाटकांचे प्रयोग करून स्वतःच्या अभिनयाला धार द्यायची, असा त्यांचा दिनक्रम असायचा. चित्रपटात एक छोटासा रोल मिळावा म्हणून ते स्टुडिओच्या पायऱ्या झिजवत राहिले.
परंतु, मुंबईत त्यांचा संघर्ष वर्ष-दोन वर्षांचा नव्हता. तब्बल एक तप म्हणजेच १२ वर्षे त्यांनी रोज नकाराचा सामना केला. सतत मिळणाऱ्या नकारांमुळे एका टप्प्यावर नवाझुद्दीन यांचा स्वतःवरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. एका मुलाखतीत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी या भावना मोकळेपणाने मांडल्या.
ते म्हणाले होते, “सुरुवातीला तुमच्या मनात खूप आत्मविश्वास आणि उत्साह असतो. पण सततच्या संघर्षानंतर तुमचा हा आत्मविश्वास ढासळू लागतो. आपण जे काही शिकलो ते चुकीचे होते का? आपल्याला काम का मिळत नाहीये? असे प्रश्न स्वतःबद्दलच निर्माण होतात.”
नवाझुद्दीन सांगतात, “एकावेळी तर माझी अशी मानसिक स्थिती झाली होती जिथे मी स्वतःवर शंका घेऊ लागलो होतो. मी या कामासाठी अयोग्य आहे असे मला वाटू लागले. जणू काही माझ्यामागे वाईट वेळ हात धुऊन लागली आहे. कोणतीही मोठी संधी हातात यायची आणि अचानक निसटून जायची. अनेक वर्ष मी हा संघर्ष केलाय.”
अशा संघर्षमय काळात प्रत्येक दिवसासोबत उमेद संपत चालली होती, तेव्हा त्यांच्या आईचे ते शब्द त्यांच्यासाठी आशेचा एकमेव किरण ठरले. त्या एका वाक्याने नवाझुद्दीन यांच्या मनातील निराशेचे रूपांतर जिद्दीत केले आणि त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरु केले.
अथक परिश्रमानंतर ‘ब्लॅक फ्रायडे’ चित्रपटातून त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. त्यानंतर आला अनुराग कश्यप यांचा ‘गँग्स ऑफ वासेपूर’! या चित्रपटाने नवाझुद्दीन यांच्या आयुष्याला अशी कलाटणी दिली की त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
त्यानंतर 'द लंचबॉक्स', 'किक', 'बजरंगी भाईजान', 'रामन राघव २.०', 'रईस', 'मॉम', 'मँटो' यांसारख्या एकापेक्षा एक सरस चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमधील 'गणेश गायतोंडे'च्या भूमिकेने तर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. 'मॅकमाफिया' या आंतरराष्ट्रीय मालिकेतही त्यांनी काम केले.
जिद्दीची आणि आशेची ‘एक कहाणी’
आज नवाझुद्दीन सिद्दीकी यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. पण ही ओळख त्यांना सहजासहजी मिळालेली नाही. आयुष्यात कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही. काळ बदलतो, वेळ बदलते, फक्त गरज असते ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहण्याची.
आईच्या एका वाक्याने ज्याप्रमाणे एका सर्वसामान्य मुलाला सुपरस्टार बनवले, तीच ही ‘एक कहाणी’ आजही लाखो तरुण-तरुणींना स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्याचे बळ देत आहे.