राजस शेख यांच्या पोलिस दलातील ३२ वर्षांच्या निष्कलंक सेवेचा भारत सरकारकडून मोठा सन्मान

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
विविध सन्मान स्वीकारताना पुणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस फौजदार राजस शेख
विविध सन्मान स्वीकारताना पुणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस फौजदार राजस शेख

 

भक्ती चाळक

एका अंधाऱ्या रात्री बोपदेव घाटातील अत्यंत निर्जन अन् शून्य नेटवर्कच्या भागात घडलेला तो गँगरेपचा गुन्हा. संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष या गुन्ह्याच्या तपासावर लागून राहिलेले. तपासाचे कोणतेही धागेदोरे हाती नसताना, केवळ आरोपीच्या टी-शर्टवरून थेट गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या होत्या. अन् या घटनेचा तपास केला होता पुणे शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस फौजदार राजस शेख यांनी.

राजस शेख यांनी ३२ वर्षांच्या प्रामाणिक सेवेत मोठी दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत भारत सरकारच्या गृहविभागाने नुकताच राजस शेख यांना ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ देऊन सन्मानित केले आहे. या पुरस्कारामुळे पुणे पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. 

‘आवाझ-द-व्हॉईस’शी संवाद साधताना राजस शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “त्यादिवशी माझ्या मित्राचा अचानक फोन आला अन् त्याने मला भारत सरकारचे अति उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याची बातमी दिली. दोन मिनिटे मन अगदी गद्गदित झाले आणि डोळ्यात पाणी आले. माझ्या आजवरच्या कष्टाचे अन् सेवेचे कुठेतरी फळ मिळाले.”

खेळाच्या आवडीतून पोलीस दलात प्रवेश
राजस शेख १९९५ मध्ये पुणे शहर पोलीस दलात भरती झाले. खाकी वर्दीची प्रचंड क्रेझ अन् वर्दीत राहून समाजासाठी, देशासाठी काहीतरी धडाकेबाज करण्याची तीव्र इच्छा त्यांना पोलीस खात्याकडे घेऊन आली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा कॉल आला अन् त्यांनी पोलीस भरतीला जाण्याचा निर्णय घेतला. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांची पोलीस दलात निवड झाली.

राजस हे स्वतः उत्कृष्ट खेळाडू आहेत. एथलेटिक्समध्ये लाँग जंप, हाय जंप, ट्रिपल जंप यामध्ये ते पटाईत होतेच, शिवाय ते राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू राहिलेले आहेत. या क्रीडा पार्श्वभूमीमुळे मैदानी चाचणीत त्यांना कोणतीच अडचण आली नाही. अभ्यासाच्या जोरावर त्यांनी परीक्षेत उत्तम गुण मिळवले अन् मेरिटमध्ये जागा पटकावली.

सुरुवातीला पोलीस मुख्यालयातील स्टोअर रूम आणि राखीव शस्त्रगार कक्षात त्यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले. पुणे शहरातील सर्व शस्त्रे, दारूगोळा अन् पोलिसांचे गणवेश यांचा लेखाजोखा ठेवणे अन् पुरवठा करण्याचे काम त्यांनी तिथे केले. पुढे २००२ मध्ये त्यांची वाहतूक शाखेत बदली झाली. त्या काळात पोलीस खात्यात प्रीपेड रिक्षाची नवीन संकल्पना सुरू झाली होती. पदवीधर असल्याने त्यांना तिथे जबाबदारी मिळाली. नंतर त्यांनी डीसीपी कार्यालयात प्रशासकीय कामकाज सांभाळले.

तपास पथकात एन्ट्री 
दर पाच वर्षांनी होणाऱ्या बदल्यांच्या नियमानुसार राजस शेख यांची वानवडी पोलीस ठाण्यात बदली झाली. तिथून त्यांच्या खऱ्या अर्थाने क्राईम डिटेक्शनच्या करिअरला सुरुवात झाली. आपल्या पोलीस दलाच्या सेवेत समाजातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश आणायचे त्यांनी ठरवले. सुरुवातीलाच चांगले ज्येष्ठ पोलीस अधिकारी गुरु म्हणून लाभले अन् त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजस शेख यांची पुढची वाटचाल सुरू झाली.

वानवडी पोलीस ठाण्यात असताना त्यांनी मर्डर, घरफोडी, अपहरण अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमधील आरोपी पकडले. यातला सगळ्यात गाजलेला अन् आव्हानात्मक गुन्हा म्हणजे मसलकर नावाच्या इसमाने केलेला ट्रिपल मर्डर. त्याने स्वतःची आई, पत्नी अन् चिमुकल्या मुलीची अत्यंत निर्घृण हत्या केली होती. प्रसारमाध्यमांचे या प्रकरणावर पूर्ण लक्ष होते. कौटुंबिक दुःख पाहता हा माणूस आरोपी असूच शकत नाही, असे सर्वांना वाटत होते. पण राजस शेख यांच्या तल्लख नजरेने त्याची संशयास्पद लकब टिपली.

वरिष्ठांना संशय व्यक्त करताना आलेल्या अनुभवाबद्दल राजस शेख म्हणतात, “सुरुवातीला वरिष्ठ म्हणाले की ज्याची आई, बायको अन् बाळ गेलेय, त्याची काय चौकशी करतोय? पण मला आतून शंका होती. आम्ही कसून चौकशी केली अन् मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी त्यानेच हा कट रचल्याचे उघड झाले आणि न्यायालयाने पुढे या आरोपीला कडक शिक्षा सुनावली.”

‘वीर’च्या यात्रेत चिमुकल्याचा शोध
वानवडीनंतर कोंढवा पोलीस ठाण्यात बदली झाल्यावर तिथेही त्यांनी तपास पथकातच काम केले. तिथे एका अत्यंत गरीब गवंडी कामगाराच्या लहान बाळाचे अपहरण झाले होते. इसमांनी त्या लहान बाळाला चोरून नेले होते. पोलीस फक्त मोठ्या लोकांसाठी काम करतात हा समज राजस शेख आणि त्यांच्या पथकाने खोटा ठरवला.

अहोरात्र शोध घेऊन अवघ्या दोन दिवसांत त्या लहान बाळाचा पत्ता लावला. पुणे जिल्ह्यातील वीर या गावातील म्हस्कबाच्या मोठ्या यात्रेत त्या बाळाला भिक मागण्यासाठी नेण्यात आले होते. पोलिसांनी तिथे जाऊन बाळाला सुखरूप ताब्यात घेतले अन् आईच्या स्वाधीन केले.

त्या भावूक प्रसंगाबद्दल बोलताना राजस म्हणतात, “त्या आईने ज्या प्रकारे आपल्या बाळाला जवळ घेतले अन् ती रडू लागली, तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे समाधान देऊन गेला. इतर कोणत्याही मोठ्या गुन्ह्याच्या शोधापेक्षा ते समाधान माझ्यासाठी खूप मोठे होते.”

एटीएम चोरीचे आंतरराज्य जाळे
२०१७ च्या डिसेंबर महिन्यात एकाच ठिकाणाहून दोनदा एटीएम मशीन चोरीला गेल्याची घटना घडली. एकाच ठिकाणाहून दोनदा चोरी झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. हे मोठे आव्हान स्वीकारून राजस शेख अन् त्यांच्या टीमने तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीवरून पुण्यापासून ते सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडीपर्यंत तब्बल नऊ दिवस सीसीटीव्ही फुटेजचा पाठलाग केला. नवव्या दिवशी एका आरोपीची माहिती मिळाली अन् त्याचे लोकेशन ट्रॅक करत ते उस्मानाबादला पोहोचले. त्याला ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता, इतर साथीदार कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर बेळगाव येथे असल्याचे समजले. तिथे जाऊन संपूर्ण टोळीला बेड्या ठोकल्या.

या चोरांचे मॅकेनिझम पाहून पोलीसही अवाक झाले होते. त्यांनी स्वतःची ट्रॉली, पुल्ली अन् स्लायडर बनवले होते. पुल्लीने एटीएम मशीन पॅक करायचे, पुढे टायर टाकून हिसका द्यायचा, ज्यामुळे ते मशीन स्लायडरवरून थेट गाडीत पडायचे. गाडीत फक्त ड्रायव्हर अन् बाजूला एक सीट सोडून सर्व भाग मोकळा केलेला असायचा. या टोळीने सातारा, सांगली, कोल्हापूर अन् उस्मानाबाद भागात केलेले तब्बल १९ गुन्हे राजस शेख यांच्या पथकाने उघडकीस आणले.

पुढे गुन्हे शाखेत बदली झाल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकात काम करताना एमडी ड्रग्ज, गांजा तस्कर आणि त्यांच्या मोठ्या गँगचा पर्दाफाश केला. नायजेरियन फ्रॉड, एटीएम क्लोनिंगचे आरोपी त्यांनी गजाआड केले.

आयपीएस अधिकाऱ्याची गळाभेट
बोपदेव घाटातील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. घाटात फोन लागत नव्हते, कोणतेही सीसीटीव्ही नव्हते आणि आरोपींनी स्वतःचे अन् पीडितांचे मोबाईल फ्लाईट मोडवर टाकले होते. तपासाचा एकही धागा हाती नव्हता.

राजस शेख यांनी दिवस-रात्र एक करून फुटेज तपासले. एका अंधूक फोटोमध्ये आरोपीच्या टी-शर्टवर एका हॉटेलचा विशिष्ट सिम्बॉल दिसला. तीच एक लिंक पकडून त्यांनी तातडीने ते हॉटेल शोधले अन् मालकाकडे चौकशी केली. मालकाने आपल्या कामगाराला ओळखले आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याने आपल्या दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.

या यशस्वी तपासाच्या आठवणीबद्दल राजस शेख सांगतात, “हा तपास पूर्ण झाल्यावर अतिवरिष्ठ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याने मला कडकडीत मिठी मारून अभिनंदन केले. वरिष्ठ अधिकारी सहसा कोणाला मिठी मारत नाहीत, पण त्या दिवशी माझ्या कामाचे खऱ्या अर्थाने चीज झाल्याचे समाधान मिळाले.”

‘गरीबाचा अमिताभ’
राजस शेख यांचे मूळ गाव पुरंदर तालुक्यातील भिवडी. या गावाला क्रांतीचा अन् स्वाभिमानाचा मोठा इतिहास आहे. आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेल्या बंडात हे सर्व गाव सामील झाले होते, म्हणूनच गावाला ‘बंडाची भिवडी’ म्हटले जाते.

आपल्या गावातील मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना राजस शेख म्हणतात, “माझ्या भिवडीच्या मातीत वेगळीच रग आहे. तीच रग घेऊन मी आजवर पोलीस खात्यात निडरपणे काम करत आलोय.”

त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी त्यांना कौतुकाने ‘गरीबाचा अमिताभ बच्चन’ म्हणायचे. स्वतः अन्याय सहन करायचा नाही आणि कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही, हे सूत्र त्यांनी आजवरच्या सेवेत पाळले आणि यापुढेही आयुष्यभर पाळण्याचे त्यांनी सांगितले.

घटनास्थळाची पाहणी करतानाची त्यांची स्वतःची एक ठरलेली कार्यशैली आहे. ते म्हणतात, “गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन बारकाईने निरीक्षण केले की १००% काही ना काही क्लू मिळतोच. तो एक धागा पकडून काम केले की यश नक्की मिळते, हा माझा अनुभव आहे.”

आईने दिली शिक्षणाची शिदोरी
राजस शेख यांचे कुटुंब अतिशय गरीब होते. सहा भाऊ-बहिणींचे हे कुटुंब. आई-वडिलांनी शेतमजुरी करून सर्व मुलांना शिकवले. आज पाचही भाऊ-बहीण पदवीधर आहेत. मोठ्या बहिणीचे लग्न लवकर झाले, पण उर्वरित सर्वांना आईने कष्टाने घडवले.

त्यांचे मोठे बंधू दिलावर मुलानी हे टाटा मोटर्समध्ये होते, बहीण आबेदा मुलाणी मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्या, दुसरी बहीण जमिला मुंबई महापालिकेत होती आणि भाऊ कादर मुलाणी पुणे जिल्हा शिक्षण मंडळात शिक्षक म्हणून निवृत्त झालेत.

आईच्या शिक्षणाबद्दलच्या आग्रहाची आठवण सांगताना ते म्हणतात, “माझी आई अशिक्षित होती, पण हातात छडी घेऊन आम्हाला अभ्यासाला बसवायची. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ती सांगायची. पालकमेळाव्याची संकल्पना आत्ता आलीय परंतु माझी आई तेव्हा दर सोमवारी सासवडच्या बाजारात आल्यावर आमच्या शाळेला भेट देऊन शिक्षकांना आमची प्रगती विचारायची.”

आजही राजस शेख हे आपल्या भावंडांसोबत एकत्र कुटुंब पद्धतीत राहतात. त्यांच्या पत्नी नजमा या वाडिया कॉलेजमधून ग्रॅज्युएट आहेत. मोठ्या मुलीने एमआयटीमधून बी.टेक केले आहे, तर लहान मुलगी १२ वीत असून तिचीही पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा आहे.

जीवनशैली आणि कामाचे संतुलन
३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत राजस शेख यांना तब्बल २८० हून अधिक बक्षीसे मिळाली आहेत. त्यांना पोलीस महासंचालकांचे ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक’ आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दोन सन्मानपत्रे मिळाली आहेत. तसेच १५ ते २५ वर्षांच्या निष्कलंक सेवेसाठी मिळणारे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ अन् २५ वर्षांवरील सेवेसाठी मिळणारे केंद्र सरकारचे ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.

आपल्या निष्कलंक प्रवासावर बोलताना ते ठामपणे सांगतात, “माझ्या आजवरच्या सेवेत एकाने तरी म्हणावे की मी लाच घेतली. लोकांची कामे नियमाने अन् हसतमुखाने केली की कोणताही ताण येत नाही. प्रत्येकाला आपल्या कामाचा नेहमी आनंद घेतला पाहिजे.”

पोलिसांचे कामाचे तास निश्चित नसल्याने त्यांची जीवनशैली ही तणावाची असते. परंतु आपली नोकरी आणि आरोग्य सांभाळत मानसिक अन् शारीरिक आरोग्यासाठी राजस दररोज घरचेच जेवण जेवतात. सकाळी ४०-४५ मिनिटे व्यायाम, प्राणायाम आणि ध्यानधारणा करतात.

तरुण पिढीला मोलाचा सल्ला देताना राजस शेवटी म्हणतात, “ध्येय निश्चित करा अन् सातत्याने त्याच्या दिशेने प्रयत्न करत राहा. सातत्य आणि मनापासून केलेले प्रयत्न तुम्हाला नक्की ध्येयापर्यंत पोहोचवतील.”

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News