काश्मीरच्या ओवेस याकुबचा एमएमए रिंगमध्ये डंका, बुल्गेरियात अवघ्या ४ मिनिटांत नॉकआउट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
ओवेस याकुब
ओवेस याकुब

 

"मला बेल्ट हवाय... भारतासाठी एक वर्ल्ड चॅम्पियनशिपचा बेल्ट हवाय. संपूर्ण भारत देश माझ्या या बेल्टची आतुरतेने वाट पाहतोय!"

पुलवामा जिल्ह्यातील मूरान या छोट्याशा गावातील एमएमए (MMA - मिक्स मार्शल आर्ट्स) फायटर ओवेस याकुब याचे हे शब्द केवळ एका खेळाडूची जिद्द दाखवत नाहीत, तर जागतिक चॅम्पियनचे स्वप्न पाहणाऱ्या भारतातील करोडो क्रीडाप्रेमींच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात.

अलिकडेच बुल्गेरियात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय लढतीत ओवेस याकुब याने घरच्या मैदानावरील बलाढ्य फायटर दालियान याला पहिल्याच फेरीत, अवघ्या चार मिनिटांत नॉकआउट केले. या दणदणीत विजयामुळे त्याची जागतिक रँकिंग वेगाने उंचावली असून भारतीय एमएमए प्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

'आवाज द व्हॉईस'साठी दिलेल्या विशेष मुलाखतीत ओवेसने काश्मीर ते आंतरराष्ट्रीय रिंगपर्यंतचा प्रवास, सोसलेले कष्ट, पराभवातून घेतलेले धडे, खाबीब नुरमागोमेडोव्हच्या टीमसोबतचे कडक प्रशिक्षण आणि भारतासाठी वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे स्वप्न यावर मनमोकळा संवाद साधला.

काश्मीरच्या गल्लीबोळातून सुरु झालेला प्रवास
साऊथ काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील मूरान हे ओवेसचे मूळ गाव. लहानाचे मोठे होत असताना आपण कधी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यावसायिक फायटर बनू, असा विचारही त्याच्या मनात आला नव्हता. सुरुवातीला त्याने 'थांग ता', कराटे, तायक्वांदो यांसारख्या खेळांत नशीब आजमावले आणि क्रीडा परिषदेअंतर्गत अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला.

परंतु, विशिष्ट नियमांच्या चौकटीत बांधलेल्या या खेळांमुळे आपल्यातील खरी फायटिंग क्षमता पूर्णपणे बाहेर पडत नाही, असे त्याला वाटू लागले. अखेर २०१७ मध्ये त्याने व्यावसायिक एमएमए (MMA) मध्ये उतरण्याचा ठाम निर्णय घेतला.

त्या काळात काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती. एमएमएमध्ये भविष्य घडवता येईल का, याबद्दल सर्वत्र अनिश्चितता होती. एकाच रात्रीत सलग पाच फायट्स जिंकून त्याने २०२२ मध्ये आपल्या प्रोफेशनल कारकिर्दीचा खरा पाया रचला.

सुरुवातीला घरच्यांचा या खेळाला तीव्र विरोध होता. इतर काश्मिरी कुटुंबांप्रमाणे त्याच्या पालकांचीही इच्छा होती की ओवेसने डॉक्टर, इंजिनिअर किंवा सरकारी नोकरीत जावे. मारामारीचा खेळ हा फक्त एक छंद असू शकतो, व्यवसाय नाही, असाच सगळ्यांचा समज होता.

जेव्हा ओवेसने शाह हमदान शाळेत लहान मुलांना मार्शल आर्ट्सचे धडे देण्यास सुरुवात केली, तेव्हा घरच्यांनी त्याला विचारले, "तू स्वतः अजून मोठे यश मिळवलेले नाहीस, तर इतरांना काय शिकवणार?"

परंतु ओवेस आपल्या ध्येयावर ठाम राहिला. जशीजशी त्याच्या विजयांची मालिका वाढत गेली, तसतसा घरच्यांचा दृष्टिकोन बदलत गेला. आज त्याचे आई-वडीलच त्याचे सर्वात मोठे समर्थक आहेत.
पराभवाने आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले...
ओवेसच्या कारकिर्दीत एका पराभवाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. तो प्रसंग आठवून तो आजही गंभीर होतो. त्या वेळी ओवेसचा स्वतःच्या ताकदीवर इतका विश्वास होता की, आपल्याला कोणीच हरवू शकत नाही अशा भ्रमात तो होता. एका महत्त्वाच्या लढतीत पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये त्याने पूर्ण वर्चस्व गाजवले. पण तिसऱ्या फेरीत प्रतिस्पर्ध्याने त्याला 'चोक होल्ड' (मान आवळणे) मध्ये पकडले आणि तो ती फायट हारला.

या एका पराभवाने त्याला स्वतःच्या तंत्राचा आणि रणनीतीचा पुनर्विकार करायला भाग पाडले. त्याने थेट डागेस्तान गाठून अत्यंत कडक प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

मागे वळून पाहताना ओवेस सांगतो की, जर तो पराभव झाला नसता, तर तो कदाचित कधीच डागेस्तानला गेला नसता. डागेस्तानमध्ये त्याला केवळ कडक प्रशिक्षणच मिळाले नाही, तर तिथली संस्कृती, टेकड्या, अन्न, आदरातिथ्य आणि परंपरांमुळे त्याला अगदी आपल्या काश्मीरचीच आठवण झाली.

तिथून परतल्यानंतर तो एक नवीन आणि अधिक धोकादायक फायटर म्हणून तयार झाला. त्यानंतर त्याने सलग सहा आंतरराष्ट्रीय सामने जिंकले असून शेवटच्या चार लढती मुदतीपूर्वीच (फिनिश) संपवल्या आहेत.

खाबीब नुरमागोमेडोव्हच्या टीमसोबत ट्रेनिंग
ओवेस सध्या जागतिक दर्जाच्या 'खाबीब नुरमागोमेडोव्ह'च्या टीमसोबत सराव करत आहे. खाबीबला घडवणारे प्रख्यात कोच जावियर मेंडेझ हेच ओवेसला मार्गदर्शन करत आहेत.

याच टीमने खाबीब नुरमागोमेडोव्ह, इस्लाम मखाचेव्ह, कमरून उस्मान आणि ओमर नुरमागोमेडोव्ह यांसारखे जगातले दिग्गज चॅम्पियन्स तयार केले आहेत. इथे ओवेसला सर्वात मोठा धडा मिळाला तो म्हणजे मानसिक कणखरता.

पूर्वी सामन्याआधी प्रतिस्पर्ध्याला कसे रोखायचे, या विचारानेच ओवेसवर प्रचंड मानसिक दडपण यायचे आणि शरीरातील ॲड्रेनालाईन वाढून तयारीवर परिणाम व्हायचा. खाबीब आणि त्याच्या टीमने ओवेसला शिकवले की, "एक फायटर म्हणून तू फक्त तुझ्या सरावावर, शिस्तीवर आणि तयारीवर नियंत्रण ठेवू शकतोस, निकालावर नाही!"

ओवेसच्या मते, हे तत्त्वज्ञान त्याच्या धार्मिक विश्वासाशीही जोडलेले आहे. पूर्ण तयारी करायची आणि निकाल अल्लावर सोडून द्यायचा, याच सूत्राने त्याने बुल्गेरियातील लढत जिंकली.
 

बुल्गेरियातील ती थरारक चार मिनिटे!
बुल्गेरियातील लढत ओवेसच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा होती. त्याचा प्रतिस्पर्धी दालियान हा दोन वेळा 'IMMAF' वर्ल्ड चॅम्पियन आणि युरोपियन चॅम्पियन राहिलेला खेळाडू होता.

घरच्या प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा दालियानला असल्याने सामन्यापूर्वी ओवेसवर थोडे दडपण नक्कीच होते. पण ओवेसने आपले मानसिक संतुलन ढळू दिले नाही. त्याने दालियानच्या कमकुवत बाजूंचा सखोल अभ्यास केला आणि रणनीती आखली. संधी मिळताच सामना संपवायचा, याच निर्धाराने तो रिंगणात उतरला. ती संधी त्याला लागलीच मिळाली. अवघ्या चार मिनिटांत ओवेसने त्याला चित केले!\.

"भारत माझ्या बेल्टची वाट पाहतोय!"
सामन्यापूर्वी ओवेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यात तो अत्यंत उत्साहाने म्हणाला होता, "मला बेल्ट हवाय! मला भारतासाठी बेल्ट हवाय! भारत माझ्या बेल्टची वाट पाहतोय!"

हे केवळ त्याचे वैयक्तिक वाक्य नव्हते, तर संपूर्ण भारतातील एमएमए प्रेमींच्या भावना होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर एमएमएमध्ये अजूनही भारताला पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनची प्रतीक्षा आहे आणि ती उणीव भरून काढायची ओवेसची इच्छा आहे.

ओवेसचे मानणे आहे की, जेव्हा एखादा भारतीय फायटर हातात तिरंगा घेऊन आंतरराष्ट्रीय रिंगमध्ये उतरतो आणि पहिल्याच फेरीत विजय मिळवतो, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या एमएमए क्षमतेकडे वेधले जाते. आपल्या देशात प्रचंड टॅलेंट आहे आणि आता त्याला जागतिक मान्यता मिळण्याची वेळ आली आहे.

जागतिक व्यासपीठावर काश्मिरी संस्कृतीचा मान
ओवेस आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली काश्मिरी ओळख अत्यंत अभिमानाने जपतो. आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यावर असताना, सोबत कोणताही भारतीय किंवा काश्मिरी सोबती नसताना त्याने आपली पारंपरिक 'कराकुली' (काश्मिरी टोपी) परिधान करण्याचे ठरवले. ती टोपी डोक्यावर घालताच संपूर्ण काश्मीर आपल्यासोबत असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली.

जगभरातील लोकांनी काश्मीरला तिथल्या आदरातिथ्यावरून, नम्रतेवरून आणि समृद्ध संस्कृतीवरून ओळखावे, अशी त्याची इच्छा आहे. त्याच्या या पारंपरिक पेहरावाने परदेशात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि अनेक लोकांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली.

जरी त्याला अजून म्हणावे तसे अधिकृत सरकारी पाठबळ मिळाले नसले, तरीही त्याला त्याची खंत नाही. एमएमए क्षेत्र निवडणाऱ्या नवीन तरुणांना प्रेरणा मिळावी, यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत आहे. पुलवामातील त्याची अकॅडमी छोटी असली, तरी आज भारताच्या कानाकोपऱ्यातून, अगदी दुबई आणि ब्रिटनमधूनही फायटर्स तिथे प्रशिक्षणासाठी येत आहेत.

'मी आता फक्त स्वतःसाठी लढत नाहीये!'
बुल्गेरियातील विजयानंतर मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने ओवेसचा विश्वास आणखी दृढ केला आहे. तो सांगतो, "मी आता फक्त स्वतःसाठी लढत नाहीये!"

या विजयानंतर त्याला संपूर्ण भारतातून फोन आणि संदेश आले. हैदराबाद, बंगळुरू आणि तमिळनाडूतील लोकांनी त्याला विजयाच्या उत्सवात सामील होण्यासाठी आव्हाहन केले. रस्त्याच्या कडेला बसून वयोवृद्ध माणसे मोबाईलवर त्याची फायट पाहत असल्याचे व्हिडिओ त्याने पाहिले.

या विजयामुळे आपल्याला जाणीव झाली की, आपला हा लढा आता वैयक्तिक राहिला नसून भारतातील तरुणाईचा आणि एमएमए समुदायाचा झाला आहे. माहितीनुसार, त्याच्या या लढतीने भारतात सुमारे २०० दशलक्ष (२० कोटी) व्ह्यूजचा टप्पा ओलांडून पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले!

वर्ल्ड टायटलवर निशाणा!
या दणदणीत विजयानंतर ओवेस जागतिक रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या वर असलेला फायटर हा सध्याचा चॅम्पियन असून त्याला ओवेसपेक्षा खूप जास्त अनुभव आहे.

घाईघाईने आव्हान देण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने पुढे जाणे ओवेसला आवडते. कोच जावियर मेंडेझ यांच्यासोबत त्याचे पुढील ट्रेनिंग कॅम्प अमेरिका आणि पाकिस्तानसह विविध देशांत होणार आहेत.

पुढील प्रतिस्पर्ध्याचा पूर्ण अभ्यास करून, टायटल फायटपूर्वी अजून एक-दोन सामने खेळायचे की थेट बेल्टसाठी लढायचे, याचा निर्णय तो घेणार आहे. भारतासाठी एमएमएचा वर्ल्ड बेल्ट जिंकणे हेच त्याचे अंतिम ध्येय आहे.

रिंगमागील संघर्ष अन् डाएटचा फंडा
बुल्गेरियातील सामन्यापूर्वीचे तीन महिने ओवेससाठी अत्यंत वेदनादायी होते. खांद्याची आणि पायाच्या घोट्याची दुखापत असतानाही त्याने सराव थांबवला नाही. वजन कमी करणे हे आणखी एक मोठे आव्हान होते, कारण त्याला पहिल्यांदाच ६८ किलो वजनी गटात उतरायचे होते. सामन्याच्या अगदी आठवडाभर आधी त्याला तीव्र तापही आला होता.

तरीही औषधे घेत त्याने वजन कमी केले आणि रिंगमध्ये उतरून विजय मिळवला. प्रेक्षक फक्त रिंगमधील चार मिनिटांचा खेळ पाहतात, पण फायटरचे खरे आयुष्य त्या मिनिटांच्या तयारीसाठी वेधलेले असते. सामना जिंकल्यानंतर फक्त २-३ दिवस आनंद साजरा करायला मिळतो आणि पुन्हा सरावाचा प्रवास सुरू होतो.

डाएटबद्दल बोलताना ओवेस सांगतो की, तो कॅलरीवर नियंत्रण ठेवतो आणि प्रोटीनवर भर देतो. स्वतःवर कठोर निर्बंध लादण्यापेक्षा संतुलित आहार घेण्याला तो पसंती देतो. आठवड्यातून एकदा तो आपला आवडता पदार्थ खातो. घरच्या घरी आंबा आणि दह्यापासून बनवलेली आईस्क्रीम ही त्याची सर्वात आवडती डिश आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News