सलग सहा सरकारी परीक्षांमध्ये बाजी मारत तेरखेडाच्या शगुफ्ता शेख झाल्या अधिकारी

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 43 m ago
६ सरकारी परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या कर निर्धारण अधिकारी शगुफ्ता शेख
६ सरकारी परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या कर निर्धारण अधिकारी शगुफ्ता शेख

 

भक्ती चाळक

धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा या छोट्याशा गावातील एक मुलगी. घरची परिस्थिती हलाखीची, वडील ट्रक ड्रायव्हर आणि आई शेतमजूर. समाजात मुलींच्या शिक्षणाला असलेला विरोध, पदोपदी ऐकावे लागणारे टोमणे आणि आर्थिक अडचणींचा डोंगर. अशा प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, एकापाठोपाठ एक तब्बल सहा सरकारी परीक्षांमध्ये यश मिळवत शगुफ्ता शेख यांनी मोठा आदर्श निर्माण केलाय.

टीसीएस (TCS) मधील नामांकित आयटी जॉब सोडून प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शगुफ्ता यांनी नुकतीच ‘कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी’ या उच्च पदावर निवड झाली आहे. ‘आवाज-द-व्हॉईस’शी बोलताना त्यांनी आपल्या या खडतर पण तितक्याच प्रेरणादायी प्रवासाचा पट उलगडला.

शिक्षणासाठीचा संघर्ष
धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा हे शगुफ्ता यांचे मूळ गाव. एक मोठी बहीण आणि दोन लहान भावांसह लहानचे मोठे होताना त्यांनी घरची गरिबी अगदी जवळून पाहिली. गावात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी धाराशिवमधून ११ वी आणि १२ वी सायन्स केले. पुढे लातूरमधून कॉम्प्युटर सायन्स (CS) मध्ये इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. आई-वडिलांची परिस्थिती बिकट असल्याने तिने एज्युकेशन लोन काढून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते.

इंजिनिअरिंगनंतर TCS कंपनीत त्यांची कॅम्पस प्लेसमेंट झाली. पुण्यात सात महिने नोकरी केल्यानंतर कॉर्पोरेट आयुष्यापेक्षा प्रशासकीय सेवेत जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ त्यांना लागली. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरताच त्यांनी कॉर्पोरेट नोकरीला रामराम ठोकला आणि अभ्यासाला पूर्णवेळ सुरुवात केली.

प्रवासातील डिप्रेशनचा काळ
पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला खरा, पण यश मिळणे सोपे नव्हते. पहिल्या तीन प्रयत्नांत प्रीलिम पास झाली, पण मेन्सच्या टप्प्यावर अपयश आले. एसटीआय (STI) ही त्यांची ड्रीम पोस्ट अवघ्या ४ मार्कांसाठी हातातून निसटली.

त्या आठवणींबद्दल सांगताना शगुफ्ता म्हणतात, “माझी स्वप्नातली एसटीआय पोस्ट अवघ्या चार मार्कांनी हुकली आणि मी फायनल लिस्टमध्ये येऊ शकले नाही. या अपयशाने मी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेले. त्या धक्कादायक मानसिक स्थितीतून बाहेर पडायला मला तब्बल दीड वर्ष लागले.”

जवळचे पैसे संपले होते. पण हार मानणे त्यांच्या रक्तात नव्हते. पुण्यात राहण्याचा अन् अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी एका स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे काम करणाऱ्या प्रकाशनात प्रूफ एडिटर आणि कंटेंट रायटर म्हणून नोकरी पत्करली. त्यांनी तयार केलेल्या एका पुस्तकाच्या तब्बल १ लाख प्रती विकल्या गेल्या. नाव कुठेही मिळाले नाही, पण त्या कामामुळे त्यांचा गाढा अभ्यास झाला आणि आर्थिक हातभारही लागला.
 

एकापाठोपाठ ६ सरकारी परीक्षांमध्ये घवघवीत यश
डिप्रेशनमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवा परीक्षांवर लक्ष केंद्रित केले. २०२३ मध्ये आलेल्या सर्व जाहिरातींना अर्ज करून अभ्यास सुरू ठेवला. पुढच्या दोन वर्षांत त्यांनी दिलेल्या ६ परीक्षांमध्ये लागोपाठ यश मिळवले.

त्यांनी जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून यश मिळवले. त्यासोबतच रत्नागिरी जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहाय्यक, मंत्रालयात सहाय्यक, लातूर कृषी संचालनालयात महसूल सहाय्यक, मुंबई जीएसटी विभागात कर सहाय्यक आणि पुणे जिल्हा परिषदेत सहाय्यक अशा तब्बल सहा वेगवेगळ्या पदांवर आपली निवड निश्चित करून घेतली.

यातील ‘कॅनल इन्स्पेक्टर’ ही पोस्ट त्यांनी जॉईन केली आणि दोन वर्षे बीड जिल्ह्यात प्रामाणिकपणे काम केले. बाकीच्या ५ पदांमधून त्यांनी स्वतः ‘ऑप्टिंग आऊट’ करून इतर गरजू उमेदवारांना संधी दिली मिळवून दिली.

समजातून प्रतिक्रिया 
मुस्लिम कुटुंबातून पुढे येऊन उच्च शिक्षण घेणे हा शगुफ्ता यांच्यासाठी खूप मोठा संघर्ष होता. आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक संघर्षावर बोलताना शगुफ्ता सांगतात, “मुस्लिम कुटुंबातून शिक्षण घेऊन पुढे जाणं हा एक वेगळाच संघर्ष आहे. बिना बुरख्याचा घराच्या बाहेर पाऊल टाकायला भीती वाटायची.”

त्या पुढे म्हणतात, “ओढणी जराशी सरकली तरी मुलगी बिघडली म्हणून लग्न लावून द्या, असा सल्ला लोक न मागता घरच्यांना द्यायचे. पण मी शिकण्यावर ठाम राहिले. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने घरातून आर्थिक मदत मिळू शकली नाही, पण आईवडिलांनी मला मानसिक आधार दिला.”

मुस्लिम समाजातल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी आज खूप संघर्ष करावा लागतो, याबद्दल खंत व्यक्त करत त्यांनी मुलींच्या पालकांना आग्रहाचे आवाहन केले. मुलींना स्वतःच्या पायावर उभे केल्याशिवाय त्यांचे लग्न करू नका आणि मुलींनीही घरच्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचेल असे कृत्य करू नये, असा संदेश शगुफ्ता यांनी दिला.

‘कर निर्धारण अधिकारी’ म्हणून नवी जबाबदारी
पुणे जिल्हा परिषदेचा निकाल आल्यानंतर शगुफ्ता यांनी कॅनल इन्स्पेक्टर पदाचा राजीनामा देऊन पुण्यात ‘सहाय्यक’ म्हणून पदभार स्वीकारला होता. आता ‘कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी’ या अत्यंत मानाच्या पदावर त्यांची निवड झाली आहे. येत्या आठवड्यात सध्याच्या पदाचा राजीनामा देऊन त्या नवीन पदाची सूत्रे हातात घेणार आहे.

पुढील वाटचालीविषयी बोलताना शगुफ्ता आत्मविश्वासाने सांगतात, “येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या आणि आव्हाने प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा निर्धार आहे. माझ्या पदाला योग्य तो न्याय आणि सन्मान मिळेल, असेच काम मी यापुढेही करत राहीन.”

हताश झालेल्या तरुण-तरुणींसाठी शगुफ्ताचा यांचा हा प्रवास एक नवा उम्मेद देणारा आहे. अपयशावेळी कोलमडून न जाता स्वतःला पुन्हा सिद्ध करत उंच भरारी कशी घ्यावी, याचे शगुफ्ता शेख हे एक उत्तम उदाहरण आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter