अहमदाबाद
सार्वजनिक सहभागाशिवाय केवळ सरकार अमली पदार्थांचे (नार्कोटिक्स) उच्चाटन करू शकत नाही, असे प्रतिपादन करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकांना अमली पदार्थांच्या विक्रीबाबत प्रशासनाला त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे. अहमदाबादमध्ये १०२४ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करताना त्यांनी ही घोषणा केली.
अहमदाबाद महानगरपालिकेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले, "संपूर्ण देश ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत ड्रॅगमुक्त करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वतः गुजरातचे असल्याने गुजरातने हे लक्ष्य ३१ डिसेंबर २०२८ पर्यंतच साध्य केले पाहिजे." नक्षलवादाचा यशस्वीरीत्या नायनाट केल्यानंतर आता तरुणाईचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थांविरुद्ध निर्णायक युद्ध पुकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ड्रग्सच्या व्यापारातून मिळणारा पैसा देशांतर्गत दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वापरला जातो, असा इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांना अमली पदार्थांच्या वापराची किंवा विक्रीची माहिती देण्यासाठी १ डिसेंबरपासून १०३३ ही विशेष टोल-फ्री हेल्पलाइन सुरू होणार आहे. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि आरोपींवर कडक कारवाई करून त्यांची गय केली जाणार नाही, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच, विद्यार्थ्यांनी वर्गात झोपणे, डोळे लाल होणे किंवा अभ्यासात लक्ष न लागणे यासारख्या बदलांवर शिक्षकांनी आणि पालकांनी बारीक लक्ष ठेवून तपासणी करून घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.
काली चौदसच्या पावन मुहूर्तावर या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात अमित शाह यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील विविध नागरी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. तसेच सरकारी कल्याणकारी योजनांतर्गत गृहवाटपाची संगणकीय सोडत काढण्यात आली व वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या प्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अहमदाबादचे महापौर हितेश बारोट उपस्थित होते.