पणजी
दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात वसलेल्या प्रसिद्ध पालोलेम बीचला (Palolem Beach) आशिया खंडातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून गौरवण्यात आले आहे. 'Beach.com' च्या ग्लोबल बीच इंडेक्स २०२६ मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट २५ समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत पालोलेम बीचने ६ वा क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने दिली आहे.
पालोलेम बीच हा जागतिक टॉप २५ च्या यादीत समाविष्ट होणारा संपूर्ण आशिया खंडातील एकमेव समुद्रकिनारा ठरला आहे. या यशामुळे गोव्याच्या किनारपट्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली आहे. सुंदर अर्धचंद्राकृती खाडी, स्वच्छ पांढरी वाळू, नारळाच्या बागा आणि शांत समुद्र यासाठी पालोलेम बीच जगभरातील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. 'Global Beach Index 2026' अंतर्गत पर्यटकांचे अभिप्राय, तज्ज्ञांचे नामांकन, नासाकडून (NASA) प्राप्त झालेली पाण्याच्या रंगाची आणि स्पष्टतेची आकडेवारी, तसेच हवामान आणि सुलभता अशा १८ निकषांवर ही पाहणी करण्यात आली होती.
या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, "हा जागतिक सन्मान गोव्याच्या किनारपट्टीचे निसर्गसौंदर्य आणि पर्यटकांना मिळणाऱ्या अद्वितीय अनुभवाची पावती आहे. राज्य सरकार आता केवळ पर्यटकांच्या संख्येवर लक्ष केंद्रित न करता, निसर्ग, स्थानिक समुदाय आणि संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या शाश्वत व जबाबदार पर्यटनाला (Regenerative Tourism) प्रोत्साहन देत आहे."
गोव्याचे पर्यटन संचालक केदार नाईक यांनी सांगितले की, या आंतरराष्ट्रीय मान्यतेमुळे जागतिक पर्यटन नकाशावर गोव्याचे स्थान अधिक बळकट होईल. यामुळे दक्षिण गोव्यातील निसर्गरम्य भागांकडे पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होईल. पालोलेम बीचवर पोहणे, कायकिंग, डॉल्फिन सफारी आणि बॅकवॉटर भ्रमंती अशा विविध उपक्रमांना पर्यटकांची पसंती असते. गोवा आता केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरता मर्यादित न राहता निसर्ग पर्यटन, अध्यात्म, वारसा सहल आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीला वाव देत आहे.