मुंबई
यंदाच्या दिवाळीत मुंबईमध्ये फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, रविवारी दिवाळीच्या एकाच रात्री फटाक्यांमुळे लागलेल्या १३७ आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. या आगी विझवताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी दिली.
बीएमसीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यंदा एकाच दिवसात लागलेल्या आगींचा हा ताडव गेल्या संपूर्ण दिवाळी सणाच्या कालावधीत लागलेल्या आगींपेक्षाही जास्त आहे. मुंबईत २०२४ मधील संपूर्ण दिवाळीत फटाक्यांमुळे ८० आगी लागल्या होत्या, तर २०२५ मध्ये ११३ आगींच्या घटना घडल्या होत्या. यंदा ६ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान एकूण २०० आगीच्या घटना फटाक्यांमुळे घडल्या आहेत, ज्या गेल्या दोन वर्षांतील संपूर्ण सणाच्या आकडेवारीपेक्षा अधिक आहेत. अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील एका इमारतीला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दिवाळीच्या रात्री मुंबईत अग्निशमन दलाला आगीचे तब्बल १४२ कॉल्स आले. शहरात एकाच वेळी अनेक ठिकाणी आगी लागल्यामुळे मुंबई अग्निशमन दलाची मोठी तारांबळ उडाली. दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात अनेक दुकाने आणि झोपड्यांना भीषण आग लागली, ती नियंत्रणात आणण्यासाठी जवानांना तब्बल ९ तासांहून अधिक काळ संघर्ष करावा लागला. विद्याविहार भागात अग्निशामक जवान आग विझवत असतानाही नागरिक फटाके फोडत राहिल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या या बेफिकीर वृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली.
गंभीर परिस्थिती पाहता मुंबई अग्निशमन दलाने नागरिकांसाठी तातडीची सुरक्षा नियमावली जारी केली आहे. निवासी इमारती, दुकाने, वाहने, पेट्रोल पंप, ट्रान्सफॉर्मर्स आणि डोक्यावरील विजेच्या तारांपासून दूर मोकळ्या जागेतच फटाके फोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलांवर पालकांनी बारीक लक्ष ठेवावे, सुती कपडे वापरावेत आणि अर्धवट जळालेले फटाके पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांनी १०१, बीएमसी हेल्पलाइन १९16 किंवा ९०७६३३३१०१ ते ९०७६३३३१०५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.