कॅन्सरवरील १३६४ औषधांचे नवीन दर लागू; ६७९ ब्रँड्सच्या किमती ५० टक्क्यांहून अधिक घटल्या

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 9 h ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

नवी दिल्ली 

कॅन्सरवरील १३६४ औषध निर्मितीच्या (Anti-cancer Formulations) सुधारित कमाल किरकोळ किमती (MRP) लागू करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कॅन्सरच्या रुग्णांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे दरवर्षी सुमारे ३,५४०.३८ कोटी रुपये वाचणार आहेत, अशी माहिती अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

ट्रेड मार्जिनवर मर्यादा आणि ९६ टक्क्यांपर्यंत दरकपात

रसायन आणि खते मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार १३७ कॅन्सर औषधांच्या ट्रेड मार्जिनवर मर्यादा घातली आहे. देशातील ८५ औषध उत्पादक कंपन्यांनी १२१ प्रकारच्या औषधांशी संबंधित १३६४ फॉर्म्युलेशन्सचे सुधारित दर जाहीर केले आहेत. यामध्ये तब्बल ६७९ ब्रँड्सच्या किमती ५० टक्क्यांहून अधिक कमी झाल्या असून, कमाल दरकपात ९६.४५ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे.

रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्सना नवीन दरांचे नियम बंधनकारक

कोणताही केमिस्ट, औषध विक्रेता किंवा रुग्णालयातील मेडिकल स्टोअर रुग्णांकडून या सुधारित एमआरपीपेक्षा जास्त दर आकारू शकत नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी किंवा रुग्णांच्या नातेवाइकांनी औषधांच्या पॅकेटवर छापलेली नवी एमआरपी तपासावी. याशिवाय 'फार्म साही दाम' (Pharma Sahi Daam) या मोबाईल ॲप्लिकेशनवरून अथवा 'nppa.gov.in' या प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सुधारित दरांची पडताळणी करता येईल.

अवाजवी दर आकारल्यास तक्रारीचे आवाहन

जर एखाद्या केमिस्टने सुधारित दरांपेक्षा जास्त रक्कम मागितल्यास नागरिक 'फार्म जन समाधान' (Pharma Jan Samadhan) पोर्टलद्वारे आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय एनपीपीएच्या १८००-१११-२५५ या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कॅन्सरच्या महागड्या उपचारांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.



Latest News