जम्मू
कॅनाबिस म्हणजेच भांगेचा वापर केवळ अंमली पदार्थांपर्यंत मर्यादित न ठेवता त्याचे औषधी गुणधर्म शोधण्यासाठी सुरू असलेल्या भारतातील पहिल्या 'कॅनाबिस मेडिसिनल रिसर्च प्रोजेक्ट'ला मोठे यश मिळाले आहे. या वनस्पतीपासून उच्च दर्जाची वेदनाशामक (Painkillers) आणि इतर जीवनरक्षक औषधे विकसित करण्यासाठी मुंबईतील प्रतिष्ठित टाटा मेमोरियल सेंटरच्या (Tata Memorial Centre) सहकार्याने पूर्व-क्लिनिकल चाचण्या (Pre-clinical trials) सुरू करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली आहे.
जम्मूमधील 'सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन' (CSIR-IIIM) येथे आयोजित आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह बोलत होते. पूर्व-क्लिनिकल अभ्यास आणि आवश्यक नियामक प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प थेट औषध उत्पादनाच्या टप्प्यात प्रवेश करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या संशोधनामुळे कर्करोग (Cancer), चेतातंतूंचे आजार (Neuropathies), मिरगी (Epileptic fits) आणि तीव्र श्वसन त्रास (ARDS) यांसारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी आणि निर्यातक्षम औषधे विकसित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP Model) तत्त्वावर राबवला जात असून, यात एका फ्रेंच कंपनीचाही सहभाग आहे. कॅनाबिसचा वापर केवळ वैज्ञानिक संशोधन आणि वैद्यकीय उपचारांसाठीच केला जाईल, याची खात्री करण्यासाठी कडक नियामक तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने २०१७ मध्ये या वैज्ञानिक शेती आणि संशोधनासाठी विशेष परवानगी दिली होती. सीएसआयआर-आयआयआयएम संस्थेने या संशोधनासाठी ५०० हून अधिक कॅनाबिस प्रजातींचे जतन केले असून सुरक्षित शेतीची सुविधा उभारली आहे. या प्रकल्पामुळे वैद्यकीय आणि आर्थिक दोन्ही स्तरांवर मोठे फायदे मिळतील, असा विश्वास डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.