एफआयए जागतिक कार्टिंग स्पर्धेत काश्मीरच्या ११ वर्षीय अतिका मीरची 'सुपर ड्रायव्हिंग'; १६ स्थानांची भरारी घेत जगात ६ वी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 9 h ago
अतिका मीर
अतिका मीर

 

ला काँका (इटली) 

भारताची ११ वर्षीय उगवती कार रेसिंग तारा अतिका मीर हिने एफआयए कार्टिंग जागतिक अजिंक्यपद (FIA Karting World Championship) स्पर्धेच्या पदार्पणातच आपल्या अफाट ड्रायव्हिंग कौशल्याचे दर्शन घडवले आहे. पहिल्या शर्यतीत तब्बल १६ प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत (ओव्हरटेक करत) तिने सहावे स्थान पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

क्वालिफाइंगमधील अडथळ्यानंतर अनपेक्षित पुनरागमन

फॉर्म्युला १ ॲकॅडमीचा (F1 Academy) पाठिंबा मिळवणारी पहिली भारतीय ठरलेली श्रीनगरची अतिका मीर १२ ते १४ वयोगटात स्पर्धा करते. वीकेंडला पार पडलेल्या या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत अतिकाच्या मार्गात सुरुवातीला मोठा अडथळा आला होता. क्वालिफाइंग फेरीत इतर दोन चालकांच्या गाड्यांचा अपघात झाल्याने अतिकाचा हॉट लॅप खराब झाला. यामुळे ती तिच्या गटात शेवटून दुसऱ्या स्थानावर आणि एकूण ८७ चालकांमध्ये ८३ व्या स्थानावर फेकली गेली होती. मात्र, 'कार्ट रिपब्लिक' टीमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काश्मीरच्या या जिद्दी मुलीने या प्रतिकूल परिस्थितीमुळे खचून न जाता आश्चर्यकारक पुनरागमन केले.

३० स्थानांची गरुडझेप अन् अप्रतिम ड्रायव्हिंग

क्वालिफायिंगच्या धक्क्यातून सावरत अतिकाने रेस १ मध्ये तब्बल १६ गाड्यांना ओव्हरटेक केले आणि सहावे स्थान (P6) मिळवले. ही या वीकेंडला कोणत्याही भारतीय चालकाने केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली. यानंतर तिने रेस २ मध्ये १० स्थानांची आणि रेस ३ मध्ये ४ स्थानांची सुधारणा करत एकूण ३० स्थानांची मोठी गरुडझेप घेतली. संपूर्ण वीकेंडचा विचार करता तिने तब्बल ४३ स्थानांची कमाई करत ८७ चालकांमध्ये ४० व्या स्थानी झेप घेतली. रविवारी झालेल्या सुपर हिट शर्यतीत ती १४ व्या स्थानावरून पुढे जात होती, मात्र हवामानाच्या बिकट परिस्थितीमुळे झालेल्या एका चकमकीनंतर ती १६ व्या स्थानावर राहिली.

"मला या सर्वोच्च पातळीवर खेळण्याचा सार्थ अभिमान"

आपल्या या कामगिरीबद्दल बोलताना अतिका म्हणाली, "क्वालिफायिंगमधील अडथळ्यानंतर मी या वीकेंडकडे ओव्हरटेकिंगचा सराव म्हणून पाहिले आणि मनापासून रेसिंग केली. मला पूर्ण विश्वास आहे की मी या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याच्या क्षमतेची आहे. चांगल्या क्वालिफायिंगसह मी आघाडीच्या स्थानांसाठी लढू शकते." अतिकाचे वडील आणि भारताचे पहिले राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियन असिफ मीर यांनीही तिच्या या धाडसी खेळाचे आणि जिद्दीचे कौतुक केले.