मुंबई
भारतात तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकच्या (Stroke) प्रमाणात वेगाने वाढ होत आहे. मात्र, दुर्दैवाने ५ टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण योग्य उपचाराच्या वेळेत (Treatment Window) रुग्णालयात पोहोचत आहेत, ज्यामुळे वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यात अडचण येत असून जीव वाचवणे कठीण होत आहे, अशी चिंता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मधुमेह, धुम्रपान, मद्यपान, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि ताणतणाव यांसारख्या घटकांमुळे स्ट्रोकच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याविषयी बोलताना ग्लोबल हॉस्पिटल्स मुंबईचे न्यूरोलॉजी आणि स्ट्रोक केअरचे प्रादेशिक संचालक डॉ. शिरीष एम. हस्तक म्हणाले, "भारतात ५ टक्क्यांपेक्षा कमी स्ट्रोक रुग्ण योग्य वेळेत रुग्णालयात पोहोचतात. इतर देशांमध्ये हीच आकडेवारी १५ ते २० टक्के आहे. जगभरात दरवर्षी १.५ ते २ कोटी लोकांना स्ट्रोकचा सामना करावा लागतो, आणि आयुष्यात कधी ना कधी चौघांपैकी एका व्यक्तीला स्ट्रोक येऊ शकतो." त्यामुळे भारतात स्ट्रोकवर वेळेत उपचार मिळण्याची सुविधा सुधारणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी भर दिला. उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर असल्याने नियमितपणे रक्तदाब तपासणे आणि योग्य व्यवस्थापन करणे स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते, असे त्यांनी सांगितले.
ग्लोबल हॉस्पिटल्सचे न्यूरोलॉजी संचालक डॉ. पंकज अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागाचा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटून रक्तस्त्राव होतो, तेव्हा स्ट्रोक होतो. पुरेशा ऑक्सिजनशिवाय मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच नष्ट होऊ लागतात, त्यामुळे वेळेवर उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता स्ट्रोक केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तरुणांमध्येही याचे प्रमाण चिंताजनक रीतीने वाढताना दिसत आहे.
ग्लोबल हॉस्पिटल परळचे इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले की, कोविड-१९ नंतर तरुणांमधील स्ट्रोकच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पूर्वी स्ट्रोक प्रामुख्याने ४० ते ५० वयोगटातील लोकांमध्ये अधिक दिसत असे, परंतु आता २० आणि ३० वयोगटातील लोकांमध्येही अशी प्रकरणे पाहायला मिळत आहेत. तरुणांमधील स्ट्रोकचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांनी वाढले असल्याचे दिसून येते.
उच्च रक्तदाब, मधुमेह, धुम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव आणि तणाव यांसारखे घटक यामागे कारणीभूत आहेत. काही महिलांच्या बाबतीत, इतर जोखीम घटक असताना तोंडावाटे घ्यायची गर्भनिरोधक औषधे देखील धोका वाढवू शकतात, असे डॉ. डांगे यांनी नमूद केले. धमनी ब्लॉक झाल्यामुळे होणारे 'इस्केमिक स्ट्रोक' ७५ ते ८५ टक्के प्रकरणांमध्ये दिसून येतात, तर मेंदूतील रक्तस्रावामुळे होणारे 'हेमोरेजिक स्ट्रोक' १५ ते २० टक्के असतात. रक्तस्त्राव झाल्यास रक्त पातळ करणारी औषधे स्थिती आणखी बिघडवू शकतात, त्यामुळे वेळेवर निदान होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.